विधायक दृष्टिकोनातून सामाजिक एकोपा!

0

पिंपरी-चिंचवड : जातीय उद्रेक किंवा विध्वंसक प्रवृत्ती जास्त काळ टिकत नाहीत. सकारात्मक, विधायक दृष्टिकोन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यातूनच सामाजिक एकोपा आणि समाज उन्नयन होईल, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत सहसचिव डॉ. मधुकर आचार्य यांनी निगडी येथे व्यक्त केले. निगडीतील मनोहर वाढोकर सभागृहात महाराष्ट्र वनवासी कल्याण आश्रम, पिंपरी-चिंचवड शाखा आयोजित पुणे जिल्हा हितचिंतक स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मीडिया ओशनचे प्राजक्त मुळे प्रमुख पाहुणे होते. शाखाध्यक्षा अंजली घारपुरे, पश्‍चिम विभाग प्रमुख पुरुषोत्तम अनंतपुरे, कोशाध्यक्ष कुलानंद ममगाई, नागेश काळे, प्रकाश टाकळकर, डॉ. अमिता आचार्य यांची आदी उपस्थित होते.

बुद्धिभेद थांबवणे आव्हान
आचार्य म्हणाले, आदिवासी किंवा वनवासी हा स्वयंपूर्ण झाला पाहिजे, हेच महाराष्ट्र वनवासी कल्याण आश्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे; आणि त्यासाठी सरकारी मदतीपेक्षा नागरी समाजाने उत्स्फूर्तपणे केलेली मदत खूप मोलाची आहे. दुर्दैवाने वनवासींना देशापासून तोडण्याचे षडयंत्र अनेक देशविघातक संघटना करताहेत. त्यांनी केलेला बुद्धिभेद थांबवणे, हे महाराष्ट्र वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्यकर्त्यांपुढे मोठे आव्हान आहे. आपल्या देशाला जर खर्‍या अर्थाने महासत्तेकडे जायचे असेल; तर जो एकदशांश समाज अतिशय विपन्नावस्थेत जगतो आहे, तो ऊर्जितावस्थेत आला पाहिजे!

हितचिंतक, देणगीदारांचा सत्कार
स्नेहमेळाव्यात महाराष्ट्र वनवासी कल्याण आश्रमाच्या वाटचालीत सहभागी असलेल्या हितचिंतक, देणगीदार यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला, त्यात डॉ. वैदेही नगरकर, माधुरी आवटे, मयूरी शिंदे, दत्तू वाघ, शंकर गोडे, सागर काटकर, श्रद्धा मराठे, हर्षल सुळेकर यांचा समावेश होता. यानंतर माले, आहुपे, चिंबळी फाटा, भोर येथील कातकरी वसतिगृह आणि संस्कारवर्गातील विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कार सादर केले.विजय बालिंगे यांनी प्रास्ताविक केले. ऋषभ मुथा, नारायण ठिकडे, प्रदीप कोंडारी, अनिल वाघमारे, विदुला पेंडसे, प्रदीप गांधलीकर यांनी कार्यक्रमाच्या संयोजनात सहकार्य केले. सोनाली सहस्रबुद्धे यांनी सूत्रसंचालन केले. अश्‍विनी चिंचोलकर यांनी आभार मानले. अमृता दाते यांनी सादर केलेल्या ’वंदे मातरम्’ने कार्यक्रमाची सांगता झाली.