मुंबई – राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या २४ जुलैपासून सुरू होणार असून ते तीन आठवडे म्हणजेच ११ ऑगस्टपर्यंत चालेल, अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेत दिली.
संसदीय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. विधिमंडळाच्या गेल्या अधिवेशनात विरोधकांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर होऊ न शकलेला शरद पवार, गणपतराव देशमुख आदी नेत्यांच्या अभिनंदनाचा व कौतुकाचा प्रस्ताव या अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात पाच ऑगस्टला मांडण्यात येणार आहे. या अधिवेशनात अध्यादेश तसेच विधेयकांच्या माध्यमातून २१ कायदा दुरूस्तीचे प्रस्ताव सभागृहापुढे चर्चेसाठी येणार आहेत. २०१७-१८ च्या पुरवणी मागण्या, शासकीय विधेयके तसेच विरोधी व सरकारी बाजूचे चर्चेचे प्रस्ताव असा कार्यक्रम ठरल्याचेही बापट यांनी सांगितले.
शनिवारी, पाच ऑगस्टला रोजी कौतुक व अभिनंदनाचा विशेष ठराव चर्चेसाठी येणार असून त्यामध्ये इंदिरा गांधी, पं. दीनदयाळ उपाध्याय, शेतकरी कामगार पक्षाचे नेते गणपतराव देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, नानाजी देशमुख, बाळासाहेब देसाई आदी नेत्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव सभागृहाच्या वतीने करण्यात येईल. २५ जुलैला विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात ज्येष्ठ नेते रा. सु. गवई यांच्याविषयी विधिमंडळाच्या वि. स. पागे केंद्राने प्रकाशित केलेल्या पुस्तकाच्या अनावरणाचा कार्यक्रम होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी उपस्थित राहणार आहेत. २३ जुलैला राज्यातील विधानसभा तसेच विधान परिषदेचे सदस्य यांच्या स्वीय सहाय्यकांसाठी अभ्यासवर्ग घेण्यात येणार आहे, असेही बापट यांनी सांगितले.