विनयभंगप्रकरणी टीव्हीएफच्या सीईओला लवकरच पोलिसांकडून समन्स

0

मुंबई – कंपनीतील सहकर्मचारी महिलेचा शारीरिक शोषण केल्याप्रकरणी बुधवारी गुन्हा नोंदविण्यात आलेल्या टिव्हीएफचे सीईओ अरुणभ कुमार यांना कुठल्याही क्षणी एमआयडीसी पोलिसांकडून समन्स पाठविले जाणार आहे. या समन्सनंतर त्यांची जबानी नोंदविण्यात येईल आणि नंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. विशेष म्हणजे यापूर्वीही एका महिलेने त्यांच्याविरुद्ध अशाच प्रकारे आरोप केला होता.

अरुणभ कुमार यांनी अन्य काही तरुणींसह महिलेचा विनयभंग केल्याचे बोलले जाते, मात्र आतापर्यंत एकाच महिलेने त्यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत तक्रार केली आहे. अंधेरी पूर्वेकडील एमआयडीसी परिसरात टीव्हीएफचे कार्यालय असून या कंपनीत ते सीईओ म्हणून काम पाहतात. काही वर्षांपूर्वी तक्रारदार महिला तिथेच कामाला होता. अनेकदा काम करताना अरुणभकुमार हे तक्रारदार महिलेचा मानसिक व शारीरिक शोषण करीत होते. सुरुवातीला तिने याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र अनेकदा ते त्यांनी तिचे शारीरिक शोषण तसेच तिच्याशी अश्‍लील वर्तन केले होते. सतत होणार्‍या शारीरिक शोषणाला कंटाळून अखेर या महिलेने आपल्या पदाचा राजीनामा देऊन ती नोकरी सोडून दिली होती. हा प्रकार तिने सेाशल मिडीयावर दिल्यानंतर रिझवान सिद्धीकी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात या महिलेच्या आरोपावरुन गुन्हा नोंदविण्याची विनंती केली होती.

मात्र पोलिसांनी गुन्हा नोंदविण्यास नकार दिला होता. या महिलेने पोलिसांत तक्रार करावी, या तक्रारीची शहानिशा केली जाईल आणि नंतर गुन्हा नोंदविला जाईल असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले होते. त्यानंतर या महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर बुधवारी पोलिसांनी अरुणभ कुमारविरुद्ध विविध भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या वृत्ताला एमआयडीसी पोलिसांकडून दुजोरा देण्यात आला असून चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान अन्य एका महिलेने अरुणभकुमारविरुद्ध तिच्या ब्लॉगवर अशाच प्रकारे शारीरिक शोषण करुन विनयभंगाचा आरोप केला होता. ही महिला अन्य कोणी आहे की तक्रारदार महिला आहे याचा आता पोलिसांकडून तपास सुरु आहे. याप्रकरणी लवकरच त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात येईल. त्यांची जबानी नोंदविल्यानंतर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.