साक्री । सकाळच्या वेळी घरकामात गुंतलेल्या विवाहितेला घरात घुसून शरीर सुखाची मागणी करीत तिचा विनयभंग करण्याचा धक्कादायक प्रकार घाणेगाव ता.साक्री येथे घडला. याप्रकरणी 32 वर्षीय विवाहितेने निजामपूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन सतीलाल भादू चित्ते या नराधमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, दि. 21 रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास घाणेगाव येथील रहात्या घरात फिर्यादी विवाहिता आंघोळीसाठी चुलीवर पाणी ठेवत असतांना सतीलाल चित्ते हा घरात घुसला आणि त्याने या विवाहितेला मागून मिठी मारली. तिचे हात घट्ट धरुन तीच्याशी लज्जास्पद वर्तन करीत शरीर सुखाची मागणी केली. यावेळी पिडीतेने त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. कशीबशी स्वतःची सुटका करुन घेतली. सतीलाल नंतर पळून गेला.
हा प्रकार घडला त्यावेळी पिडीत विवाहितेचा पती हा शौचासाठी घराबाहेर गेलेला होता आणि तीची लहान मुले झोपलेली होती. काही वेळाने विवाहितेचा पती घरी आला असता तीने त्यास आपबिती सांगितली. त्यावर पतीने सतीलालला गाठून जाब विचारला असता सतीलालने त्यालाही शिवीगाळ करीत दम दिला. याप्रकरणी निजामपूर पोलिस ठाण्यात पिडीतेने फिर्याद दिली त्यावरुन पोलिसांनी सतीलाल चित्ते विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.