प्रभाग क्रमांक चारमधील रस्त्याची रिलायन्सने लावली वाट
पिंपरी-चिंचवड : महापालिका इ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत प्रभाग क्रमांक 4 मध्ये मे. रिलायन्स जिओ इन्फोकॉम लि. यांनी विनापरवाना रस्ते खोदाई केली. रस्ते खोदाई करुन महापालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान केले. तसेच डांबरी रस्त्याची वाटली लागली. याप्रकरणी पालिका स्थापत्य विभागाने केवळ नोटीस बजावून दंडात्मक कारवाईतून रिलायन्सची सुटका केली आहे. दरम्यान, शहरात अनेक ठिकाणी रस्ते खोदाई सुरु आहे. अनेक कंपन्या पालिकेकडे रस्ते खोदाईचे प्रस्ताव देवून थेटपणे रस्ते खोदाई करु लागल्या आहेत. त्यामुळे महापालिकेचा महसूल बुडाला आहे.
भारतमाता नगर रस्त्याच्या कडेला खोदाई
इ क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग क्रमांक 4 मधील दिघी येथील भारतमाता नगर रस्त्याच्या कडेला रिलायन्सने चर खोदाई केली आहे. महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता मे. रिलायन्स जिओ इन्फोकॉमने ही रस्ते खोदाई करुन फायबल केबल टाकण्यात येत आहे. याबाबत नागरिकांनी तक्रार करताच ई क्षेत्रीय कार्यालयाने मे. रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड कंपनीस नोटीस पाठविली आहे. याबाबत कंपनीने विनापरवाना रस्ते खोदाई करून फायबर केबल टाकल्याचे महापालिकेला 18 नोव्हेंबरला 2017 रोजी निदर्शनास आले. तरीही महापालिकेच्या स्थापत्य अधिकार्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. याविषयी रस्ते खोदाई करण्यास महापालिकेची परवानगी घेतली असल्यास रिलायन्स जिओ कंपनीने त्याची प्रत चार दिवसात स्थापत्य विभागाकडे पाठविण्यात यावी, तोपर्यंत रस्ते खोदाई करू नये, अन्यथा महापालिका नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा कार्यकारी अभियंता जीवन गायकवाड यांनी नोटीसद्वारे दिला आहे.