विनापरवाना रुग्णांवर औषधोपचार करणे भोवले

0

धुळे । उल्हासनगर येथील प्रा. शरद थोरात हे पिंपळनेर येथे आले असता त्यांना तातडीच्या उपचाराची गरज भासली. यावेळी उपचार करतांना पिंपळनेरच्या डॉक्टरांनी हलगर्जीपणा केला. परिणामी, त्यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली. या तक्रारीतील सत्यता पटल्याने धुळे जिल्हाधिकार्‍यांनी प्रा. थोरात यांना न्याय देतांनाच डॉ. जाधव दांम्पत्यावर चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार शुक्रवार, 25 रोजी आरोग्याधिकार्‍यांनी ताफ्यासह पिंपळनेर गाठून चौकशी करीत गुन्हा दाखल केला.

परवाना निलंबित असतांनाही औषधोपचार
याबाबतची माहिती अशी की, उल्हासनगर येथील प्रा. शरद थोरात पत्नी शुभदासह पिंपळनेर येथे आले असता त्यांच्या पायाला इजा झाली. त्यामुळे त्यांना डॉ. जाधव यांच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले. डॉ. जाधवांनी केलेल्या उपचारामुळे थोरात यांना बरे वाटण्याऐवजी पायाला गॅगरीन सदृश्य आजाराची बाधा झाली. परिणामी त्यांना 15 लाख रूपये खर्चुन शस्त्रक्रिया करावी लागली. डॉ. जाधव यांच्या चुकीच्या उपचाराने जीवावर बेतले म्हणून थोरात यांनी तक्रार केली होती. मेडीकल कौन्सिलकडे ही तक्रार केल्याने 16 एप्रिल 2018 रोजी डॉ. जाधव यांचा वैद्यकीय परवाना निलंबित करण्यात आला होता. तरीही ते रूग्णावर उपचार करीत असल्याने थोरात यांनी थेट जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केली होती. एकूणच, प्रकरण पहाता जिल्हाधिकार्‍यांनी शुक्रवार, 25 रोजी आरोग्य विभागासह अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांना बोलावून त्यांना पोलीस फौजफाट्यासह पिंपळनेर येथे जावून कारवाई करण्याचे आदेश दिले. मात्र त्यासाठी दिलेला लिफाफा हा पिंपळनेरात गेल्यानंतरच उघडावा आणि ज्याचे नाव असेल त्याच्यावर कारवाई करावी, असे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितल्याने अतिरिक्त जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. शिवचंद सांगळे, अन्न औषधचे अधिकारी सहा पोलिसांसह पिंपळनेरला गेले. तेथे लिफाफा उघडल्यानंतर डॉ. महेश जाधव यांचे नाव निष्पन्न झाल्याने या पथकाने त्यांच्या रूग्णालयात जावून खातरजमा केली. यावेळी डॉ. जाधव यांचा वैद्यकीय परवाना 15 एप्रिल 2020 पर्यंत निलंबित केल्याची बाब निदर्शनास आली. शिवाय ते परवाना निलंबित असतांनाही औषधोपचार करीत असल्याने त्यांच्या विरोधात डॉ. सांगळे यांनी रितसर पिंपळनेर पोलिसात तक्रार नोंदविली. त्यानुसार डॉ.जाधव दांम्पत्यावर गुन्हा दाखल झाला.