पुणे । डेक्कन जिमखाना आयोजित मराठे ज्वेलर्स पुरस्कृत 5व्या सुदेश शेलार मेमोरियल करंडक राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत उपउपांत्यपुर्व फेरीत मुंबई उपनगरच्या ओंकार तोरगलकर, ठाण्याच्या विपुल नांदकर यांनी आपापल्या गटातील मानांकीत खेळाडूंचा पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथील बॉक्सिंग हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत उपउपांत्यपुर्व फेरीत युथ मुलांच्या गटात ठाण्याच्या तेराव्या मानांकीत विपुल नांदकरने मुंबई उपनगरच्या चौथ्या मानांकीत मंदार हर्डीकरचा 7-11, 5-11, 11- 9, 17- 15, 11- 4, 8-11, 11-7 असा पराभव करत उपांत्यपुर्व फेरी गाठली.
मुंबई शहरच्या अव्वल मानांकीत शुभम आंब्रेने ठाण्याच्या ओंकार घागचा 11-8, 11-2, 11-8, 11-6 असा पराभव केला. पुरूष गटात बिगर मानांकीत मुंबई उपनगरच्या ओंकार तोरगलकरने नाशिकच्या सातव्या मानांकीत अजिंक्य शिंद्रेचा 11- 4, 11-8, 11- 6, 11-2 असा पराभव करत उपांत्यपुर्व फेरी गाठली. पुण्याच्या तेराव्या मानांकीत सनत बोकीलचा मुंबई उपनगरच्या चौथ्या मानांकीत शुभम आंब्रेने 6-11, 11-8,11-6, 11-8, 11-6 असा पराभव केला. ज्युनिअर मुलींच्या गटात मुंबई उपनगरच्या तिसर्या मानांकीत आदिती सिन्हाने पुण्याच्या नेहा महांगडेचा 11-4, 11-6, 16-14 असा पराभव करत उपउपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. पुण्याच्या आठव्या मानांकीत ईशा जोशीने पुण्याच्याच मृण्मयी रायखेळकरचा 11-6, 11-5, 11-8, असा पराभव करत आगेकूच केली.