’कार्गो’सेवेचे ’बीएसओ’ यार्डात स्थलांतर : विस्तारीकरणाबाबत बैठक
पुणे : लोहगाव विमानतळावरील ’कार्गो’ सेवा अर्थात मालवाहतुकीचे स्थलांतर सध्या मोकळ्या असलेल्या बरॅक स्टोअर ऑफिसच्या (बीएसओ यार्ड) जागेत करण्यात येणार आहे. कार्गो स्थलांतरामुळे लोहगाव विमानतळाच्या नवीन टर्मिनलच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. नुकतीच दिल्ली येथे संरक्षणमंत्री निर्मला सितारामन, केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणाबाबत बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.
विमानतळ परिसरातील बीएसओ यार्ड (बरॅक स्टोअर ऑफिस) आणि सीडब्ल्यूई ऑफिस (कमांडर वर्क्स इंजिनिअर ऑफिस) हे नवीन जागेत हलविण्यात यावे. त्यासाठी राज्य शासनाने हवाई दल व विमानतळ प्राधिकरणास जागा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण व्हावी, अशी चर्चा या बैठकीत करण्यात आली. तोपर्यंत सध्या मोकळ्या असलेल्या बीएसओ यार्डाच्या जागेत मालवाहतूक स्थलांतरीत करण्यात येणार आहे. विमानतळावरील मालवाहतुकीचे स्थलांतर विमानांच्या हँगर्सच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेत करावे, अशीही मागणी असून त्यासाठी औपचारिक प्रस्ताव पाठवून त्यावर निर्णय होणार आहे.