विमानतळ पुरंदरलाच होणारः जिल्हाधिकारी

0

पुणेः प्रस्तावित छ. संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदर येथून इतरत्र हलविण्यात येणार अशी चर्चा सुरू होती. हवाई दलाने तांत्रिक अडचणीमुळे पुरंदर विमानतळाबाबत आक्षेप घेतला होता. मात्र तांत्रिक अडथळा दूर करण्याचा प्रयत्न असून येत्या आठवडाभरात अहवाल आल्यानंतर विमानतळाचा प्रश्‍न मार्गी लागणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.

संरक्षणाच्या दृष्टीने हवाईदलाच्या विमानांना पुरंदर विमानतळामुळे अडचणी येऊ शकतात त्यामुळे हवाईदलाने विमानतळाबाबत नकारात्मक भूमिका घेतली होती मात्र एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाकडून तांत्रिक अडथळ्यांबाबत विश्‍लेषण देण्यात येणार असून गरज पडल्यास विमानतळाच्या धावपट्टीत थोडे बदल करण्यात येणार आहेत. त्यासंदर्भात येत्या आठ ते दहा दिवसांत अहवाल आल्यानंतर विमानतळाचा प्रश्‍न मार्गी लागणार असल्याचे राव यांनी सांगितले.

सर्कीट हाउसच्या छतावर पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री तसेच सरकारी व्हीआयपी यांच्याकरीता हेलिपॅड उभारण्याचे प्रस्तावित आहे. मात्र संरक्षण मंत्रालयाकडून यासंदर्भात अनुकुलता मिळत नाही. अनेकवेळा पत्रव्यवहार केला असून या कामासाठी मंजुरी मिळण्यसाठी अडचणी येत आहेत. हे हेलिपॅड कोणत्याही परिस्थितीत खासगी वापरासाठी देण्यात येणार नसले तरी सुमारे पावनेदोन वर्षे झाली तरी संरक्षण मंत्रालयाकडून मान्यता मिळत नाही. यासंदर्भात यापुढेही पाठपुरावा सुरू राहणार असल्याचे जिल्हाधिकारी राव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.