नवी दिल्ली । विमानप्रवास पेपरलेस बनवण्यासाठी आता सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आता लवकरच विमान तिकीट बुक करताना आधार नंबर, पॅन नंबर किंवा पासपोर्ट नंबर देणे आवश्यक असणार आहे. उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी सांगितले की, विमान तिकीट बुक करताना विशेष डिजिटल ओळख सुरू करण्याचे काम सुरू आहे.
सध्या प्रवाशांना विमातळावर प्रवेश करण्यासाठी एक ओळखपत्र जवळ ठेवण्याची गरज असते. सिन्हा म्हणाले की, आता प्रवाशांना आधार, पॅन किंवा पासपोर्ट क्रमांक ओळख म्हणून सुनिश्चित करण्याचा प्रस्ताव आहे. ही योजना लवकरच लागू केली जाणार आहे. नागरी विमान मंत्रालया अंतर्गत एक डिजिटल प्रवासी कार्यकारी समिती तयार करण्यात आली आहे जेणेकरून या नियमांना लागू करण्याआधी काही सूचनाही मिळवता येतील.ते म्हणाले की, या नियमांमध्ये आधार क्रमांक घेणे अनिवार्य केले जाणार नाही, तर आधारला डिजिटल ओळखपत्रांच्या पर्यायांमध्ये ठेवलं जाणार आहे. ही एक ऐच्छिक गोष्ट असून अनिवार्य नाहीये. प्रवाशांना आताही बोर्डिंग पाससोबत प्रवास करण्याचा पर्याय आहे, जो त्यांच्या इच्छेवर अवलंबून आहे. येत्या 30 दिवसांत यासंबंधी एक अहवाल तयार केला जाईल, आणि अंतिम रूप देण्याआधी सूचनांचा विचार केला जाईल.