विम्बल्डनमध्ये भारतीयांनी केली विजयाची बोहनी

0

विम्बल्डन। विम्बल्डन स्पर्धेत भारतीय टेनिसपटूंनी विजयाची बोहनी केली आहे. पुरुषांच्या दुहेरीच्या लढतीत दिवीज शरण आणि पुरव राजा या भारतीय जोडीने दुसर्‍या फेरीत स्थान मिळवले. तर महिलांच्या दुहेरीच्या लढतीत सानीया मिर्झाने आपली बेल्जीयन साथीदार क्रिस्टेन फ्लिपकेन्ससह पहिला फेरीचा अडथळा सहज पार केला. भारताचा आणखी एक टेनिसपटू जीवन नेदुचेझीयनला मात्र पहिल्या फेरीतच आपला गाशा गुंडाळावा लागला.

मागील वर्षी पुरुष दुहेरीतील पहिल्याच फेरीत पराभूत झालेल्या राजा आणि शरण जोडीने यावेळी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना जोरदार लढत दिली. या जोडीने काही सेट पॉईंट वाचवत सामान आपल्या खिशात टाकला. भारतीय जोडीने काईल सुमारे 3 तास 3 मिनीटे रंगलेल्या लढतीत कायल एडमंड आणि जॅकी सोसा या ब्रिटीश- पोर्तगीज जोडीवर 7-6 (2),3-6, 6-4, 7-6(6) असा विजय मिळवला. महिला दुहेरीच्या लढतीत सानीया आणि क्रिस्टेन या जोडीला दुसर्‍या फेरीत स्थान मिळवताना त्रास झाला नाही.

अझारेंकाची आगेकूच
गत डिसेंबर महिन्यात एका मुलाची आई झालेल्या व्हिक्टोरिया अझारेंकाने विजयी आगेकूच कायम राखली आहे. महिला एकेरी लढतीतील तिसर्‍या फेरीत प्रवेश करताना अझारेंकाने 15 व्या मानांकित रशियाच्या एलेना वेस्नीनावर 6-3, 6-3 असा विजय मिळवला. मुलाच्या जन्मानंतरची अझारेंकाची ही दुसरी स्पर्धा आहे. तिसर्‍या फेरीत तिच्यासमोर ब्रिटनच्या हिथर वॉटसनचे आव्हान असेल. वॉटसनने दुसर्‍या फेरीत अनास्तासिजा सेवेस्तोवाचा 6-0, 6-4 असा सरळ पराभव केला होता.

जीवन अपयशी
एकीकडे दुहेरीच्या लढतींमध्ये भारतीय खेळाडू आगेकूच करत असताना जीवन नेदुचेझीयनला मात्र कडव्या लढतीनंतर अपयशाला सामोरे जावे लागले. पाचव्या सेटपर्यंत लांबलेल्या लढतीत जीवन आणि त्याचा जोडीदार जेरार्ड डोनाल्डसनला जे क्लार्क आणि मार्कोस विलीस या जोडीकडून 7-6(4), 7-5, 6(3)-7, 0-6, 3-6 असा पराभव पत्करावा लागला.