विरवाडे गावी घरफोडी; 25 तोळे सोने लंपास

0

चोपडा। चोपडा तालुक्यातील विरवाडे या गावी काल दि 12 च्या मध्यरात्री 11 ते सकाळी 4 वाजेच्या सुमारास दरोडेखोरांनी अशोक सुकलालसिंग पाटील (राजपूत) यांच्या रहात्या घराचा कडी-कोयंडा धारदार हत्याराने तोडून जवळपास 20 हजार रुपये व सुमारे 25 तोळे सोने व चांदी असे एकूण 3 लाख 80 हजाराचा ऐवज लंपास केला. सदरील कुटुंबीय हे दोंडाईचा येथे गावाला गेलेले होते. सकाळी गावातील व्यक्ती दूध वाटप करण्यासाठी गेले असता त्यांच्या लक्षात ही गोष्ट आली. अशोक पाटील यांच्या फिर्यादीवरुन चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीसीटिव्हीत पुरावा
या घटनेचा व्हिडीओ तेथील हाकेच्या अंतरावर असणार्‍या चौकातील सीसीटिव्ही कॅमेरात काही प्रमाणात कैद झालेला आहे व त्यावरून या घटनेमधील दरोडेखोर हे तीन मोटरसायकलीवर होते व त्यांनी फक्त 13 मिनिटात हात साफ केल्याचे बोलले जात आहे. तरी घटनास्थळी श्वानपथक व ठसे तज्ज्ञ दाखल झालेले होते. परंतु श्वानपथकास या ठिकाणी अपयश प्राप्त झाले. वरीष्ठ अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली असून या घटनेचा तपास सपोनि रामकृष्ण पवार हे करीत आहेत.