विराटला हवी खेळाडूंसाठी पगारवाढ

0

नवी दिल्ली । क्रिकेटच्या अतिव्यस्त वेळापत्रकावर टीका केल्यानंतर विराटने आता संघातील सहकार्‍यांसाठी पगारवाढीची मागणी केली आहे. त्याशिवाय विराटने बीसीसीआयच्या नफ्यात खेळाडूंचा वाटा वाढवून मागितला असल्याचे सूत्रांनी सांगितले. सध्या टीम इंडियातील टॉप खेळाडूंची कमाई दुप्पट नफ्यासह 3 लाख डॉलर म्हणजे जवळपास 20 कोटी रुपयांच्या घरात गेली आहे. शुक्रवारी नवी दिल्लीत बीसीसीआयसोबत भारतीय संघाची बैठक होणार आहे. या बैठकीत खेळाडूंच्यावतीने कर्णधार विराट कोहली, माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी आणि प्रशिक्षक रवी शास्त्री पगारवाढ व इतर मागण्या बोर्डासमोर मांडणार असल्याचे समजते.

बीसीसीआयने सप्टेंबरमध्ये प्रसारणाच्या हक्काबाबत मोठा करार केला आहे. माध्यमसम्राट म्हणून ओळखल्या जाणार्‍या रुपर्ट मर्डोकच्या मालकीच्या स्टार इंडिया वाहिनीसोबत 2018 ते 2022 पर्यंतच्या काळात आयपीएल प्रसारणाच्या हक्काचा करार केला आहे. या करारामुळे बीसीसीआयला स्टार इंडियाकडून 2.5 अब्ज डॉलर इतकी रक्कम मिळणार आहे. कामगिरीच्या आधारे भारतीय संघातील खेळाडूंची तीन श्रेणीत विभागणी करण्यात येते. या श्रेणीनुसार खेळाडूंसोबत वार्षिक करार करण्यात येतो.