मुंबई : भारतीय क्रिकेट संघाच्या परदेश दौऱ्यावर खेळाडूंना त्यांच्या पत्नींना सोबत नेण्यास भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने केवळ दोन आठवडेच खेळाडूंना आपल्या पत्नींना परदेश दौऱ्यावर घेऊन जाता येत होते. त्यानुसार त्यावर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने तीव्र नाराजी व्यक्त करत संपूर्ण मालिकेत पत्नींना सोबत नेण्याची विनंती केली होती. विराटच्या या हट्टासमोर बीसीसीआय झुकली असून संपूर्ण मालिकेत खेळाडूंना पत्नीला सोबत घेऊन जाण्याची परवानगी दिली आहे.
अनेक दिवसांच्या चर्चेनंतर सल्लागार समितीने विराटची मागणी मान्य केली आहे. पण, कोणत्याही परदेश दौऱ्याच्या पहिल्या दहा दिवसांनंतर खेळाडूंना आपापल्या पत्नींना दौऱ्यावर बोलावता येईल, अशी अट त्यांनी घातली आहे. विराटने पंधरा दिवसापूर्वी बीसीसीआयकडे ही विनंती केली होती. त्याला प्रशासकीय समितीने मान्यता दिली. या पत्नींच्या उपस्थितीमुळे संघातील वातावरण सकारात्मक राहण्यास मदत होईल, असे प्रशासकीय समितीने सांगितले.
क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही 2015 मध्ये असाच नियम केला होता. प्रशासकीय समितीच्या बैठकीला विराटसह मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि रोहित शर्मा हे उपस्थित होते. भारतीय संघाचा सलामीवीर गौतम गंभीरने काही दिवसांपूर्वी विराटच्या मागणीला अप्रत्यक्षपणे पाठींबा दिला होता.