विराट खेळत असेपर्यंत प्रत्येक विक्रम धोक्यात – सुनिल गावसकर

0

नवी दिल्ली : विराट कोहली सध्या ज्या प्रकारे खेळतो आहे, ते पाहता तो असेपर्यंत प्रत्येक विक्रम धोक्यात असेलं असं मत भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी व्यक्त केलं आहे. नुकत्याच विंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत विराटने सचिनचा सर्वात जलद १० हजार धावांचा विक्रम आपल्या नावे केला आहे.

“विराट कोहली सर्वाधिक धावा, सर्वाधिक शतकं असे सर्व विक्रम तो मोडू शकतो कारण त्याचा फिटनेस चांगला आहे. खेळाडू जर शाररिकदृष्ट्या तंदुरुस्त असेल तर पुढची ७-१० वर्ष तो सहज खेळू शकतो. सचिननेही वयाची ३५ वर्ष ओलांडल्यानंतर क्रिकेट खेळणं सुरुच ठेवलं होतं. जर कोहलीही इतकी वर्ष खेळू शकला तर कसोटी आणि वन-डे क्रिकेटमधले सर्व विक्रम त्याच्या नावावर होतील.” असे गावसकर यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना म्हंटले आहे.

भारत रविवारपासून विंडीजविरुद्ध ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळेल. या मालिकेत विराटला विश्रांती देऊन रोहितच्या हातात कर्णधारपद दिलेलं आहे. या मालिकेत भारताला विराटची उणीव नक्कीच भासेल, मात्र ज्या पद्धतीने भारतीय संघाने आशिया चषकात जोरदार कामगिरी केली, त्याचप्रमाणे या मालिकेतही भारताला अशीच कामगिरी करावी लागणार आहे. विंडीजचा टी-२० संघ हा वन-डे व कसोटी संघापेक्षा अधिक ताकतवर असेल, त्यामुळे भारताला कोणतीही गोष्ट गृहीत धरुन चालणार नाही. असंही गावसकर यांनी म्हंटल आहे.