विराट हिंदु धर्मजागृती सभेचा उत्साह शिगेला

0

जळगाव : शहरातील शिवतीर्थ मैदानावर रविवारी 25 रोजी विराट हिंदु धर्मजागृती सभा होणार असल्याने या सभेचा स्थानिक हिंदुत्ववादी संघटना, धर्माभिमानी आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांच्याकडून जोमाने प्रसार केला जात आहे. त्यामुळे जनमानसांमध्ये धर्मजागृती सभेविषयीचा उत्साह शिगेला पोचला आहे. याचा परिणाम म्हणजे ठिकठिकाणी विविध मंडळांचे कार्यकर्ते, हिंदुत्ववादी, धर्माभिमानी, सांप्रदायिक आणि विविध युवकांचे गट सभेला उपस्थित रहाण्याचे नियोजन करत असल्याचे दिसून येत आहे.

जळगाव शहर आणि ग्रामीण भागात कोपरा सभा, समूह बैठका, घरोघरी निमंत्रण, रिक्शाद्वारे उद्घोषणा, सामाजिक संकेतस्थळे (व्हॉटस अ‍ॅप, फेसबूक, टविट्र) आणि अन्य संकेतस्थळे यांच्या माध्यमातून या सभेचा प्रसार अखंडीत चालू आहे. तसेच काही धर्माभिमानी भ्रमणध्वनीहूनही अनेकांना संपर्क करून धर्मसभेचे निमंत्रण देत आहेत. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये सभेविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.सभेच्या यशस्वीतेसाठी व्यासपीठ समिती, मैदान समिती, वाहनतळ समिती, प्रदर्शन समिती, भोजन समिती, विद्युत समिती यांसारख्या समित्या गठीत करण्यात आल्या असून सभेची पूर्वतयारी चालू आहे.