मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका
मुंबई – आम्ही देखील संसदेत विरोधात होतो. पण आम्ही कधी यांच्यासारखे वागलो नाही. यांची लोकशाही फक्त भाषणापुरती मर्यादीत आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. लोकशाहीची हत्या करण्याचे काम १९७५ मध्येच काँग्रेसने केले होते. विरोधकांकडून संसदीय अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकशाहीची सातत्याने संसदेत हत्या होत असताना सगळ्यांनी पाहिल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. काँग्रेसला लोकशाहीची चाड नसल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. विलेपार्ले येथे भाजपने एक दिवसीय उपोषण केले. मुख्यमंत्र्यांसह मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, खासदार पूनम महाजन, परेश रावल, अमित साटम, पराग अळवणी हे देखील उपोषणाला बसले होते. त्यावेळी ते बोलत होते.
लोकशाहीमध्ये संसदेला कायदे करण्याचा अधिकार आहे. मात्र, या लोकशाहीच्या मंदिरामध्ये काहींनी थिल्लरपणा चालवला आहे. जनतेने नाकारल्यामुळे काहींनी थयथयाट चालवला असून जसा पाण्याविना मासा तडफडतो, तसे सत्तेविना हे लोक तडफडत असल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे. अनेक महत्वाचे कायदे ज्याचा थेट परिणाम सामान्य माणसावर होतो, असा एकही कायदा विरोधकांनी पास करू दिला नसल्याचा ठपकाही मुख्यमंत्र्यांनी ठेवला आहे. संसदेत खोटे बोलता येत नाही. त्यामुळे तिथे चर्चेविना गदारोळ करुन हे बाहेर येऊन बोलतात, अशी टीका देखील फडणवीस यांनी केली आहे.
तुमचे हात भ्रष्टाचाराने बरबटले असल्यानेच तुम्ही संसदेत बोलत नाही. तुम्ही खरे लोकप्रतिनिधी असाल तर संसदेत बोला, असे आव्हानही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांनी दिले आहे. आता आम्ही घेतलेल्या निर्णयांमुळे देश बदलत असल्याने विरोधक संसदेत गदारोळ करत असल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. जेव्हा मोदी बोलायला उभे राहतात तेव्हा यांचे चेहरे बारीक होतात. संसदेत गदारोळ घालायचा आणि बाहेर येऊन मोठमोठ्या गप्पा मारायच्या, असे विरोधकांचे वर्तन असल्याची बोचरी टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मी नांदेडला जाणार आहे. पण कुणीही काळजी करू नका, मी छोले भटुरे खाणार नाही, असा चिमटा देखील मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना काढला.