विरोधकांकडे बॉलरच नाही : आढळराव पाटील

0

जुन्नर : मी चौकार मारायला उभा आहे, मात्र समोर विरोधकांकडे अजूनही बॉलरच नाही, असे प्रतिपादन शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आळेफाटा येथे आयोजित स्ट्रीट लाइट प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.

शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विशेष प्रयत्नांतून कल्याण-नगर महामार्गावरील आळे, आळेफाटा, वडगाव आनंद दरम्यानच्या रस्त्यावरील पूर्ण झालेल्या सुमारे 2 कोटी रुपये खर्चाचे पथदिवे (स्ट्रीट लाइट) प्रकल्पाचे उद्घाटन तसेच आळे बस स्थानकाजवळील सुमारे 13 लाख रुपये खर्चाच्या उंच पाण्याच्या टाकीचे उद्घाटन खासदार आढळराव पाटील यांच्या हस्ते झाले. विरोधकांना गेली पंधरा वर्षे उमेदवारच मिळेना. माझ्या विकासकामांवर व जनतेवर माझा विश्वास असल्याने आगामी लोकसभा निवडणुकीतही विजयी होणार असल्याचा निर्धारही आढळराव पाटील यांनी या वेळी बोलताना व्यक्त केला. बाळासाहेब कुर्‍हाडे यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामशेठ गावडे, तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर खंडागळे, जिल्हा परिषदेतील शिवसेना गटनेत्या आशा बुचके, अरुण गिरे, सभापती ललिता चव्हाण, पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे, माजी सभापती संगीता वाघ उपस्थित होते.