विरोधकांची कीव, राफेलचा मुद्दा निष्प्रभ

0

भुसावळातील प्रचार सभेत आमदार हरीभाऊ जावळे व आमदार चैनसुख संचेती यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर डागली टिकेची तोफ

भुसावळ- राफेल मुद्यावरून विरोधकांची कीव वाटते, विरोधकांकडे मुद्दे नसल्याने ते निष्प्रभ ठरले आहेत, आमचे सरकार मजबूर नाही तर मजबूत सरकार आहे, पुलवामा हल्ल्याचा बदला आम्ही 400 अतिरेक्यांचा खातमा करून घेतला, असा दावा आमदार हरीभाऊ जावळे यांनी केला. भाजपा-सेना युतीच्या उमेदवार खासदार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ शहरातील संतोषी माता सभागृहात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सभेचे मंगळवारी दुपारी एक वाजता आयोजन करण्यात आले होते मात्र सोलापूरच्या सभेत उशीर झाल्यानंतर प्रत्यक्षात पावणेतीन वाजता गडकरींचे भुसावळात आगमन झाले.

तालुक्यात प्रथमच दुष्काळ -आमदार जावळे
भुसावळसह रावेर व यावल तालुक्यात प्रथमच दुष्काळ पडला असून 280 मिलिमीटर पर्जन्यमान झाल्याने दुष्काळाच्या झळा जाणवत असल्याचे आमदार हरीभाऊ जावळे म्हणाले. भाजपा सरकारच्या काळात देशात रस्त्यांचे जाळे मजबूत झाले तर जलवाहतुकीसह जलसंधारणालाही चालना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शेळगाव प्रकल्पाला भाजपा सरकारच्या काळात चालना मिळाल्याचे ते म्हणाले.

काँग्रेसच्या काळात अत्याचार वाढले -आमदार संचेती
काँग्रेस सरकारच्या काळात मुस्लीम समाज अशिक्षित ठेवून अत्याचार करण्यात आला, असा आरोप आमदार चैनसुख संचेती यांनी केला. सोनियाजी गांधी यांची ओळख केवळ राजीव गांधी यांच्या पत्नी अशी असून त्यांचे जितके वय तितके स्व.अटलबिहारी वाजपेयी यांचा अनुभव होतो, असे सांगून सोनियांनी लग्नासाठी देश सोडला मात्र वाजपेयी यांनी देशासाठी लग्न सोडल्याचे ते म्हणाले.

समृद्ध भारत घडवणार -रक्षा खडसे
जळगावसह बुलढाणा भाग ातील रस्त्यांचे काम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे मार्गी लागले तसेच महाराष्ट्रातील खासदारांचे प्रश्‍नदेखील त्यांच्यामुळे सुटल्याचे खासदार खडसे म्हणाल्या. देशाचे नाव जगापुढे नेवून समृद्ध भारत भाजपा सरकार घडवणार असल्याचा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

अनेकांचा भाजपात प्रवेश
केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे माजी उपनगराध्यक्ष विजय चौधरी यांच्यासह शेख पापा शेख कालू, निलेश वसंत चौधरी, रफिक शेख कालू, शंकर चौधरी, गुड्डू (नरेंद्र) अग्रवाल, मराठा समाजाचे अध्यक्ष रवींद्र लेकुरवाळे आदींनी असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला तर खासदार रक्षा खडसे यांना प्रसंगी धोबी समाजातर्फे कैलास शेलोडे, संतोष चिंचोले, रवीकुमार स्वामी, विश्‍वकुमार सुतार समाजातर्फे, मी वडार महाराष्ट्राचा तसेच कोळी महासंघातर्फे पाठिंब्याचे पत्र देण्यात आले.

यांची होती व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर माजी मंत्री एकनाथराव खडसे, उमेदवार खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, आमदार हरीभाऊ जावळे, आमदार चैनसुख संचेती, जिल्हा बँक अध्यक्षा अ‍ॅड.रोहिणी खडसे-खेवलकर, माजी आमदार दिलीप भोळे, जिल्हा परीषद सदस्य पल्लवी सावकारे, जि.प.अध्यक्षा उज्वला पाटील, उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, नगराध्यक्ष रमण भोळे, उद्योजक मनोज बियाणी, रीपाइं उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे, भाजपा तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, अशोक कांडेलकर, रवी पवार, शिवसेना तालुकाप्रमुख समाधान महाजन, नगरसेवक पिंटू कोठारी रेल्वे सल्लागार समिती सदस्य अनिकेत पाटील, बबलू बर्‍हाटे, यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाजपा-सेना पदाधिकार्‍यांची अनुपस्थिती खटकली
भुसावळात केंद्रीय मंत्र्यांची सभा असतानाही जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जिल्हाध्यक्ष उदय वाघ, आमदार स्मिता वाघ, आमदार चंदूलाल, सहकार मंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदींची अनुपस्थिती उपस्थितांना खटकली तर वरणगावचे भाजपाचे नगराध्यक्ष सुनील काळे हेदेखील कार्यकर्त्यांमध्ये बसले असताना त्यांना व्यासपीठावर निमंत्रण देण्यात आले नसल्याची कुजबूज होती.

गडकरींची आमदारांकडे सदिच्छा भेट
नितीन गडकरी यांनी सभेनंतर आमदार संजय सावकारे यांच्या निवासस्थानी भेट दिली. याप्रसंगी त्यांनी विना साखरेचा चहा घेत सावकारे दाम्पत्याची आस्थेवाईकपणे विचारपूस करीत निवडणुकीविषयीदेखील चर्चा केली. याप्रसंगी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, गडकरी यांच्या दौर्‍याप्रसंगी जामनेर रोडवरील वाहतूक थांबवण्यात आली तर पोलिसांनी चोख बंदोबस्तही राखला होता.

वेळेअभावी नाथाभाऊ, आमदार सावकारेंचे भाषण झालेच नाही
सोलापूर येथील सभा आटोपल्यानंतर प्रत्यक्षात गडकरी यांचे भुसावळातील सभास्थळी पावणेतीन वाजता आगमन झाले. आधीच सभेला दोन तास विलंब झाल्याने व रणरणत्या उन्हामुळे माजी मंत्री एकनाथराव खडसे व आमदार संजय सावकारे यांचे भाषण होणार नसल्याचे आयोजकांनी सांगितले. सभेचे सूत्रसंचालन भाजपा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे यांनी केले.