विरोधकांना पराभव आत्ताच दिसू लागला- पंतप्रधान मोदी

0

मुंबई : कोलकत्तामधील विरोधकांच्या महाआघाडीच्या सभेनंतर आक्रमक झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार टीका केली. विरोधकांना आगामी लोकसभा निवडणुकीतील आपला पराभव आत्ताच दिसू लागला असून निवडणुकीपूर्वीच आपल्या पराभवाची कारणे शोधली आहेत. हे लोक आतापासूनच ईव्हीएमवर दोषारोप करू लागले आहेत, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाना साधला. पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्रातील हातकणंगले, कोल्हापूर, माढा, सातारा आणि दक्षिण गोव्यातील भाजपच्या बुथ पातळीवरील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

पंतप्रधान मोदींनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना शनिवारी कोलकाता येथे तृणमूल काँग्रेसने आयोजित केलेल्या विरोधकांच्या सभेचा समाचार घेतला. विरोधकांनी आघाडी केली असली तरी आपण देखील आघाडी केली आहे. त्यांनी राजकीय पक्षासोबत आघाडी केली आहे आणि आपण मात्र सव्वाशे कोटी भारतीयांसोबत आघाडी केली आहे. त्यामुळे कोणती आघाडी अधिक चांगली आहे हे तुम्हीच सांगा, असे म्हणत पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांची महाआघाडी भ्रष्टाचारी लोकांची महाआघाडी असल्याची टीका केली आहे.

मोदी म्हणाले, विरोधकांचा कोणत्याही संस्थेवर विश्वास राहिला नसून विरोधक घटनात्मक संस्थांना बदनाम करत आहेत. विरोधक ज्या मंचावर एकत्र आले, ज्या मंचावरून त्यांनी लोकशाही वाचवण्याची भाषा केली, त्याच मंचावरून एका नेत्याने बोफोर्स घोटाळ्याची आठवण करून दिली, असं म्हणत सत्य नेहमी समोर येतच असतं, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. सवर्णांसाठीच्या १० टक्के आरक्षणाचा फायदा अनेकांना होणार असून अनुसूचित जाती-जमातीतील नागरिकांच्या हक्कावर गदा येणार नसल्याचेही मोदींनी स्पष्ट केले .