विरोधकांनी तुरूंगात जाण्याची घाई करू नये

0

धुळे । नेहमीची फालतुगिरी बंद करा. शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून विरोधकांच्या मागण्या पुर्ण करणे हे माझे कामच आहे. तुरुंगात जाण्याची एवढी घाई करु नका. फक्त सुरुवात कोणापासून करायची तेवढेच सांगा, असे सुनावत आ.अनिल गोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ओपन चॅलेंज स्विकारले आहे.

आ.गोटे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सफेदपोष नेत्यांना तुरुंगाचे वेध लागले आहे. माझ्याकडे मागणी करतांना त्यांनी जाहिरपणे ‘आमच्या नेत्यांना तुरुंगात टाका’ असे केलेले आव्हान माझ्या वाचनात आले. राष्ट्रवादीला तीन वेळा आपटी देवून शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यामुळे विरोधकांच्या मागणीचा सन्मान करणे हे माझे कर्तव्यच आहे. फक्त प्रश्न ऐव्हढा आहे की, सुरुवात नेमकी करायची कोणापासून? कार्यकर्ते तुरुंगात आधी जावून आपल्या नेत्यासाठी तुरुंगाच्या कोठड्या स्वच्छ करुन ठेवणे, लाईन लावून ठेवणे इत्यादी व्यवस्था करणार आहेत की नेता आधी जाणार आहे. हे प्रथम मला सांगितले तर तशी व्यवस्था करणे सोयीचे होईल. हे माझे म्हणणे नाही.

मा.आ. कदमबांडेंना नऊ प्रश्‍न
कालच्या पत्रकात राष्ट्रवादीवाल्यानेच मी मुख्यमंत्र्यांच्या जवळचा आहे असे सांगितले. त्यामुळे मला सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून मुख्यमंत्र्यांकडून तसा तुम्हाला ‘आत’ पाठविण्याचा क्रम ठरवुन घेता येईल. पुन्हा नंतर नाराजी नको. आ.गोटेंनी पत्रकात पुन्हा एकदा माजी.आ.राजवर्धन कदमबांडेंना नऊ प्रश्न विचारले असून कदमबांडेंनी त्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. शहरातील मातवलेल्या गुंडांपासून किंवा ते आपल्यावर उलटू नयेत म्हणून जीवाच्या भितीने तुम्हाला सुरक्षितता म्हणून तुरुंगात जायचे आहे. हे मी चांगल्या प्रकारे ओळखून आहेत. त्यामुळे आपली इच्छा लवकरच पुर्ण होईल असेही आ. अनिल गोटे यांनी राष्ट्रवादीला सुनावले आहे.