रांची: कालपर्यंत विरोधक माझ्यावर टीका करत होते, पण कालपासून त्यांनी ईव्हीएमवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. विरोधकांना लोकसभेत पराभव समोर दिसत असल्याने आता त्यांनी ईव्हीएमला दोष द्यायचे ठरवले आहे, अशी माहिती माझ्या कानावर आली असल्याचा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगावला आहे. झारखंडमधील प्रचारसभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. यावेळी नरेंद्र मोदींनी श्रीलंकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत 2014 लोकसभा निवडणुकीआधी भारतातही हेच सुरु होतं अशी टीका केली आहे.
झारखंडमध्ये तुम्हीही अनुभव घेत असाल की ज्या ठिकाणी लोक सुर्यास्तानंतर बाहेर पडण्यास घाबरायचे तिथे आता परिस्थिती बदलत आहे असे नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितले. या चौकीदाराने पाकिस्तानला त्याच्याच भाषेत उत्तर दिले आहे. आम्ही घरात घुसून दहशतवाद्यांना मारले आहे. आज प्रत्येक दहशतवाद्याच्या मनात भीती आहे की आपण काही चूक केली तर मोदी आहे असे मोदींनी यावेळी मतदारांना सांगितले. काँग्रेसला देशाच्या सेवा करण्यासाठी सरकार नको आहे. ते फक्त एका कुटुंबाचा विचार करतात आणि त्यांच्यासाठी समर्पित करण्यात आले आहे असा टोला यावेळी त्यांनी लगावला.