विरोधकांनी लटकवले प्रकल्प

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोधकांवर घणाघात; नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमीपूजन

मुंबई : पूर्वीच्या सरकारच्या कारभारामुळे अनेक प्रकल्प लटकल्याचा आरोप देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ‘लटकाना, अटकाना आणि पटकाना’ हे पूर्वीच्या सरकारचे धोरण होते. कोणताही प्रकल्प पूर्ण करण्याऐवजी ते लटकवण्यावरच पूर्वीच्या सरकारचा भर होता. त्यांच्या काळात सुमारे १० लाख कोटींचे प्रकल्प लटकले होते. पण आमच्या सरकारने ते कार्यान्वित केले, असे मोदी यावेळी म्हणाले. मोदींच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमीपूजन करण्यात आले. त्याचवेळी जेएनपीटी टर्मिनलचे लोकार्पणही केले. त्यानंतर बोलताना मोदींनी विकासकामांची माहिती देताना विरोधी पक्षांवर टीका केली. यावेळी बोलताना त्यांनी सागरी वाहतुकीचे महत्व विशद करताना सांगितले की, सागरी मार्गांचा जास्तीत जास्त वापर करण्याची सरकारची योजना आहे. सागरी मार्गाचा वापर केल्यास कमी वेळेत जागतिक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात माल पोहोचवू शकतो. साडेसात हजार किलोमीटरच्या समुद्राचा आपण लाभ घेतला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनीही सामरिक ताकद ओळखली होती, असेही मोदी म्हणाले.

हवाई धोरण आमच्या सरकारने आणले
ते म्हणाले, सुमारे २०-२५ वर्षांपूर्वी भारतातील विमानतळावर जितकी वाहतूक होती. आज त्याच्यापेक्षाही जास्त वाहतूक ही एकट्या मुंबई विमानतळावरून होते. ज्याप्रमाणे बससाठी गर्दी असते त्याप्रमाणे विमानासाठी गर्दी असते. आपल्या देशात हवाई धोरणच नव्हते. पण आमच्या सरकारने हे धोरण अस्तिवात आणले. आम्ही विचार केला हवाई चप्पल घालणार व्यक्ती ही हवाई प्रवास केला पाहिजे आणि ते आम्ही प्रत्यक्षातही आणले. ९०९ विमाने खरेदी करण्याच्या ऑर्डर दिल्या आहेत. हवाई क्षेत्रामुळे पर्यटनालाही चालना मिळेल, असेही त्यांनी म्हटले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मंजुरी मिळून अनेक वर्षे झाली. आतापर्यंत अनेकांनी आश्वासने दिलीत. या प्रश्नावरून अनेक आमदार, खासदार, सरकारे येऊन गेली. पण काम काही पुढे सरकलेच नाही. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात याचे स्वप्न पाहण्यात आले आणि मी पंतप्रधान बनताच हा प्रश्न मार्गी लावला, हे सांगण्यास ते विसरले नाहीत. नवी मुंबई विमानतळ हे देशातील सर्वांत पहिले आणि मोठे ग्रीन फिल्ड विमानतळ असेल असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

मुंबईचे चित्र २०२२ पर्यंत पालटणार
2022 पर्यंत नवी मुंबईचे चित्र पालटणार असून, हवाई वाहतूक, रस्ते वाहतुकीत मोठे बदल झालेले दिसतील. तसेच शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय स्मारकासह सर्व महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण होणार आहेत. देशात एव्हिएशन पॉलिसी नव्हती, आमच्या सरकारने पॉलिसी आणली. एव्हिएशन सेक्टरमधील सुधारणांमुळे देशातील पर्यटन क्षेत्रास चालना मिळणार असल्याचे सूतोवाच मोदींनी केला आहेत. त्यांनी या भाषणाची सुरूवात मराठीतून केली. विशेष म्हणजे शिवसेनेचा कार्यक्रमावर बहिष्कार होता.