धुळे । शहरातील विकास कामांवरील एकाच पक्षात असलेल्या आ. अनिल गोटेंचा केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, राज्याचे पर्यटनमंत्री ना. जयकुमार रावल यांच्याशी खटका उडाला असून जनभावनेचा आक्रोश करीत उभय मंत्र्यांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांकडे विरोधकांसोबत जावून काय चूक केली? याचा पाढाच आ. गोटेंनी वाचला आहे. आपल्या नेहमीच्या शैलीत या स्वपक्षातील मंत्र्यांचा समाचार घेतांना त्यांनी जयकुमार रावलांच्या वाढदिवशी दोंडाईचात झालेल्या शाही कार्यक्रमाची इत्यंभूत माहिती दिली. त्याचवेळी शहिद योगेश भदाणेच्या परिवारावर ओढवलेल्या प्रसंगाचे गांभीर्यही स्पष्ट केले. धर्मा पाटलाला मंत्रालयात जावून आत्महत्या करावी लागली. त्यांच्या शेताशेजारी शेत असल्याचे सांगणार्या रावलांनी त्यांना न्याय का मिळवून दिला नाही? असा सवालच आ. गोटेंनी रावलांना केला आहे. हे सांगतांनाच केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे हे नेहमी पंतप्रधान मोदींचा वास्ता देवून खोटे बोलतात. हे सप्रमाण सिध्द केले आहे.
असा केला आरोप
शहीद योगेश भदाणेच्या कुटुंबियांना सरकार 1 कोटी 1 लाख 25 हजार रूपये मदत करणार असल्याचे पत्र दाखविणार्या मंत्री भामरे यांनी निव्वळ धूळफेक केल्याचे म्हटले आहे. केेंद्रात किंवा राज्यात शहीदाला मदत करण्याची अशी कुठलीही योजना नसल्याने तसेच मंत्र्यांनीही कुठला कागद या शहिदाच्या परिवाराला दिलेला नसल्याने या परिवाराचा न्याय मिळण्याचा मार्ग खुंटला आहे. इतकेच नव्हे तर, धुळ्यातील कै. तुषार सराफ या भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्याच्या निधनानंतर त्यांच्या परिवाराला मदत करण्याचे आश्वासन देणार्या मंत्री भामरेंचा खोटेपणाही आ. गोटे यांनी जाहीरपणे मांडला आहे. एकूणच धुळ्यातील विकास कामात जनभावना म्हणत विरोधकांना मदत करणार्या स्वपक्षियांचा आ. गोटे यांनी खरपूस समाचार घेतला आहे. त्याचवेळी कायद्याचे ज्ञान नसल्याने कुणीही ही मंदिरे वाचवू शकत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. जर ही मंदिरे वाचवायचीच होती तर त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या मंदिरांचा उल्लेख अधिकृत किंवा अनधिकृत अशा दोघांपैकी कुठल्यातरी एका यादीत येणे आवश्यक होते. ते जर केले असते तर अधिकृत असो वा अनधिकृत या मंदिरांच्या पूनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागला असता. मात्र, ते काहीच न करता केवळ श्रध्देच्या नावाखाली गळा काढून आणि अर्ध्या माहितीच्या आधारे त्यांना मदत करतांना स्वत:च उघडे पडण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती, असेही आ. गोटेंनी या पत्रकात नमूद केले आहे.