अधिवेशनाचा हा सेकण्ड लास्ट आठवडा. अर्थसंकल्पानंतर काहीतरी वादळी होईल अशी अपेक्षा असताना सगळं कामकाज अगदी शांततेत आणि सौदार्हपूर्ण वातावरणात सुरु आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीला काही विषयांवरून आकांडतांडव केलेले विरोधक देखील आता थंडावले असल्याचे चित्र आहे. गेले मुद्दे कुणीकडे? असेच या निमित्ताने म्हणावेसे वाटत आहे.
मंत्रालयामध्ये होणाऱ्या आत्महत्या, आत्महत्या करण्याचे वाढलेले प्रयत्न, शेतकऱ्यांमध्ये सरकारप्रती वाढीस चाललेली नकारात्मकता, कर्जमाफीचा अजूनही न उलगडलेला प्रश्न, बोंड अळी, फवारणी मृत्यू, गारपीट अशा कृषकांच्या समस्यांसह वाढती गुन्हेगारी, भ्रष्टाचार, महागाई याप्रश्नांवरून विरोधक सरकारला अधिवेशनच चालू देणार नाहीत की काय? असेच चित्र सुरुवातीच्या काळात दिसले मात्र सरकारने या सर्वच मुद्द्यांवरून विरोधकांना शांत केलेय असे म्हणावे लागेल. काही विषयांवर उपाय दिले तर काही मुद्द्यांना नेहमीप्रमाणे बगल दिली. शिवसेनेकडून होणारा प्रखर विरोध, सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये वाढत चाललेली नाराजी, न्यायाधीश लोया मृत्यू प्रकरण, पीएनबीचे नुकतेच गाजत असलेले प्रकरण यांसह समुद्धी महामार्गाचा प्रश्न, नाणार रिफायनरी प्रकल्प यांसह अनेक प्रकल्पांची कार्यवाही, मेक इन इंडिया व्हाया मॅग्नेटिक महाराष्ट्रचा लेखाजोखा या गोष्टींवरून अधिवेशनात कामकाजच चालणार नाही अशी स्थिती होती. मात्र असे झाले नाही.
या सगळ्याच मुद्द्यांवर मात करत सरकारने अधिवेशन आतापर्यंत तरी रेटून नेले आहे. एका भाजपच्या सिनियर आमदाराला भेटलो. त्याने ऑफ द रेकॉर्ड सांगितले की, हे विरोधक फारच थंड आहेत. आज इतके मुद्दे आहेत कि, एक मिनिटभर सुद्धा अधिवेशन चालू दिले नसते. पण हे विरोधक शांत का आहेत हेच समजत नाही. खरतर लोकशाहीत विरोधक हा महत्वाचा पिलर मानला जातो. कारण सरकारच्या चुकीच्या धोरणावर अंकुश ठेवण्याचे काम विरोधक करतात. लोकांच्या समस्यांना, प्रश्नांना योग्य पद्धतीने न्याय मिळावा यासाठी विरोधकांची भूमिका मह्त्वाची असते. मात्र इथं ती भूमिका पार पाडण्यात विरोधक कमी पडताहेत. दुसरीकडे सोशल मीडियात सरकारविरोधी वातावरण निर्माणहोत आहे. ज्या सोशल मिडीयाचा वापर करून भाजप सत्तेवर येण्यास मोलाची मदत झाली आज तोच सोशल मिडीया सरकारवर पलटवारहोतानाचे चित्र आहे. मंत्रालयात आत्महत्या, शेतकरी आत्महत्या, महिलांवरील वाढते अत्याचार, शेतकरी कर्जमाफी यांसह अनेक फसलेल्या योजनांची चिरफाड राज्यातील तरुणाई सोशल मिडियावरून मोठ्या प्रमाणात करत असल्याचे चित्र आहे.या सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करण्यासाठी भाजप नेहमीच प्रयत्नशील असते. सरकारकडून ‘महामित्र’ सारख्या नव्या योजना आणल्या जात आहेत मात्र विरोधकांना याचा वापर करता येत नसल्याचे चित्र आहे. याला जयंत पाटलांचा अपवाद म्हणावे लागेल कारण गेल्या तीन चार दिवसापासून त्यांनी सोशल मीडियात चांगले लिहीणाऱ्या पोरांचे कौतुक करत त्यांना घरी इस्लामपुरला येण्याचे आमंत्रण दिलेय. जयंत पाटलांची ही पत्रे सध्या सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरत आहेत.
– निलेश झालटे