विरोधात बोलल्यास गळा दाबतात

0

अहमदनगर : देशातील काही औद्योगिक घराणे देशाच्या सांस्कृतिक विविधतेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या एकच आवाज उमटतो आहे. पण विरोधात आवाज निघाला तर गळा दाबण्याचे काम होत आहे. हे भयसूचक आहे, असे मत साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सावेडी उपनगर शाखेने विभागीय मराठी साहित्य संमेलन भरवले असून त्याचे उद्घाटन संमेलनाध्यक्ष प्रा. पठारे यांच्याहस्ते झाले. यावेळी पठारे यांनी देशातील सद्यपरिस्थितीवर आपले विचार मांडले.

देशाची वाटचाल आणीबाणीच्या दिशेने
या संमेलनात पठारे म्हणाले, देशात असहिष्णुतेचे वातावरण आहे. नरेंद्र मोदी यांना लोकशाही व्यवस्थेने पंतप्रधान केले आहे. त्यांचा आदर करतो. पण त्यांनी काही चुकीचे केल्यास त्याला विरोध केला पाहिजे. लोकशाहीत वेगवेगळ्या भूमिका व्यक्त झाल्याच पाहिजेत. काही औद्योगिक घराणे देशाच्या सांस्कृतिक विविधतेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. या परिस्थितीखाली दबून गेलो तर पुढील पिढ्या माफ करणार नाहीत. तर कवी रामदास फुटाणे म्हणाले, देशाची वाटचाल आणीबाणीच्या दिशेने सुरू आहे. याची जाणीव संमेलनातून करून द्यावी. शेतकरी आत्महत्या झाल्यानंतर कविता लिहिण्यापेक्षा आत्महत्येपासून परावृत्त करणारे लेखन करावे.

नेत्यांची संमेलनाकडे पाठ
सौरऊर्जा प्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राळेगणसिद्धी येथे होते. त्यामुळे अनेक नेत्यांनी संमेलनाकडे पाठ फिरवली. पालकमंत्री राम शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, खासदार दिलीप गांधी, आमदार संग्राम जगताप यांच्यासह जिल्हाधिकारी अभय महाजन यांची नावे निमंत्रण पत्रिकेत असूनही ते संमेलनाकडे पाठ फिरवत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला गेले.