विरोधी पक्षांनी सहकार्य केल्यास प्रश्न सुटतील -मोदी

0

नवी दिल्ली-पावसाळी अधिवेशनात अनेक महत्वपूर्ण विषयांवर चर्चा होणे गरजेचे आहे. चर्चा होईल तितका देशाला फायदा होईल. सर्व वरिष्ठ सदस्यांचे सभागृहाला मार्गदर्शन मिळेल. सरकारलाही त्यांच्या सूचना मार्गदर्शक ठरतील. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष सभागृहाच्या कामकाजासाठी वेळ देतील. विरोधी पक्ष वेळेचा योग्य वापर करतील, असा मला विश्वास आहे, असा आशावाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

संसदेतील आदर्श कामकाजाची छबी देशातील विविध विधानसभांनाही प्रेरक ठरेल, असे कृत्य विरोधी पक्ष करतील. सभागृहात जितकी व्यापक चर्चा होईल, त्याचा देशाला अधिक फायदा होईल. सरकारला ते मार्गदर्शक ठरेल. देशात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. तर काही ठिकाणी कमी पाऊस पडतोय. अशा परिस्थितीत सभागृहाचे कामकाज होणे महत्वाचे आहे. अनेक महत्वाच्या विषयांवर निर्णय होणे गरजेचे असल्याचे मोदींनी सांगितले.

दरम्यान, देशातील लोकांच्या समस्या सोडवण्यात मोदी सरकार अपयशी ठरले असून त्याविरोधात विरोधकांकडून अविश्वास ठराव मांडला जाईल, असे लोकसभेतील काँग्रेसचे गटनेता मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. ‘सभागृहाचे कामकाज विरोधी पक्षांमुळे होत नसल्याची टीका होते. पंतप्रधान तेच सांगतात आणि त्याला प्रसिद्धी दिली जाते पण, वास्तवात सत्ताधारीच महत्त्वाच्या मुद्दय़ांवर चर्चा करण्याचे टाळतात. त्यामुळे यावेळी आम्ही आधीपासूनच स्पष्ट सांगू इच्छितो की विरोधकांना कामकाज हवे आहे’, असेही खरगे यांनी सांगितले.