विविध आंदोलनांनी नागपूर दणाणणार

0

नागपूर : सरकारी कर्जमाफीवरून शेतकर्यांमध्ये असलेली तीव्र नाराजी आणि त्यावरून विरोधी पक्षासह सत्तेत सोबत असलेल्या शिवसेनेची नाराजी, अंगणवाडी सेविकांच्या मानधनाचा लटकलेला प्रश्‍न , फवारणीत झालेले मृत्यू, आरोग्याच्या समस्या, मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप अशा घेर्‍यात अडकलेल्या सरकारची सोमवारपासून नागपुरात अग्निपरीक्षा सुरु होतेय. विरोधकांकडून सरकारविरोधात सुरू असलेले हल्लाबोल आंदोलन या पार्श्‍वभूमीवर हिवाळी अधिवेशनात राजकीय वातावरण मात्र ऐन थंडीत तापणार तापणार आहे. जनतेतील असंतोषामुळे 100 हून अधिक मोर्चे नागपूर अधिवेशनावर धडकणार असून यासाठी पोलीस तसेच एसआरपीचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आले.दुसरीकडे आम्ही अधिवेशनासाठी तयार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असून एकूण 13 विधेयके प्रस्तावित आहेत. तसेच आधीची 5 प्रलंबित अशी एकूण 19 विधेयके अधिवेशनात चर्चेला येणार आहेत. सोबतच कृषी, जलसंपदा, आरोग्य, रोजगार, स्वच्छता, उद्योग यासंबंधी अनेक महत्वाचे तारांकित प्रश्‍न या अधिवेशनात चर्चेला येणार आहेत. विरोधकांच्या कडव्या विरोधाचा सामना करून सरकार किती प्रश्‍न सोडविण्यात यश मिळवते याकडे लक्ष लागून आहे.

मोर्चे, आंदोलनांचा महापूर
सोमवारपासून सुरू होणार्या विधिमंडळ अधिवेशनासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली आहे. विधान भवनावर यंदा निघणार्या मोर्चांची संख्या 100 च्या घरात असण्याची शक्यता आहे. आतापर्यंत 53 जणांनी अर्ज सादर केले असून 40 संघटनांना परवानगी देण्यात आली असल्याची माहिती आहे.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त
आंदोलनांच्या पार्श्‍वभूमीवर पाच हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली असून सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन कॅमेरे तसेच पोलिसांनाही व्हिडिओ कॅमेरे पुरविण्यात आले असून या माध्यमातून अधिवेशनावर येणारे मोर्चे तसेच गर्दीवर लक्ष ठेवले जाणार आहे. या अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर विधान भवन रस्त्यावरून वेगवेगळ्या दिशेने वळवलेली वाहतूक, नाक्या नाक्यांवरील पोलीस बंदोबस्त यामुळे या परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

जनआक्रोश मोर्चाची हवा
अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीने पुकारलेल्या हल्लाबोल आंदोलनाची हवा सध्या जोरात आहे. राष्ट्रवादीने यासाठी विदर्भात केलेल्या पायी यात्रेमुळे चांगलेच वातावरण निर्मिती झाली आहे. 12 डिसेंबर रोजी नागपूरमध्ये धडकणार्या या मोर्चाला स्वत: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे संबोधणार आहेत. तर काँग्रेसकडून गुलाब नबी आझाद हे येणार आहेत. 4 लाखांपर्यंत गर्दी या मोर्चात होणार असल्याचा दावा दोन्ही पक्षांकडून करण्यात आला आहे. विरोधी पक्षातील आमदार हल्लाबोल आंदोलनात सहभागी झाले आहेत.

या मुद्द्यानी घेरले सरकार
हिवाळी अधिवेशनामध्ये सरकारला अनेक समस्यांनी आणि प्रश्‍नांनी घेरले जाणार आहे. यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे आकड्यांच्या घोळात अडकलेली कर्जमाफी. कर्जमाफीवरून सरकारला रोषाचा सामना करावा लागणार आहे. गेल्या तीन महिन्यापासून सुरु असलेल्या या गोंधळाचा सामना सरकार कसे करेल हे पाहण्याजोगे ठरेल. सोबतच मुख्यमंत्र्यांकडे असलेला गृह विभाग देखील विविध प्रकरणांमुळे हिटलिस्टवर आहे. यामध्ये प्रामुख्याने सांगलीचे अनिकेत कोथळे हत्या प्रकरण, पोलीस अधिकारी बिद्रे गायब प्रकरण, यासह वाढती गुन्हेगारी विरोधकांच्या निशाण्यावर असेल.
राज्यभरातील खड्ड्यांनी वेढलेले रस्ते देखील निशाण्यावर असतील. सोबतच आरोग्याच्या वाढत्या समस्या देखील सरकारला अडचणीत आणणार आहे.

मंत्र्यांवरील आरोप तापदायक
पारदर्शी आणि प्रामाणिक कामाचा दावा करणार्‍या सरकारमधील एक मंत्री असलेले एकनाथराव खडसे भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे बराच काळ मंत्रिमंडळाबाहेर आहेत. सोबतच मंत्रिमंडळातील उद्योगमंत्री, गृहनिर्माण मंत्री यांच्यासह काही मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, यावर देखील अधिवेशनात गदारोळ होण्याची शक्यता आहे. सोबतच काही मंत्र्यांची बेताल वक्तव्ये देखील या निमित्ताने रडारवर येण्याची शक्यता आहे.