पिंपरी-चिंचवड :- दरवर्षी ५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे, हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे. या दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिका अ प्रभागाच्या अध्यक्षा अनुराधा गोरखे यांच्या पुढाकारातून विविध उपक्रमांनी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. निगडी प्राधिकरणातील सिटी प्राईड शाळेत वृक्षारोपण आणि आकुर्डी मंडईत प्लास्टिक बंदी अभियानाअंतर्गंत कापडी पिशव्यांचे वाटप पर्यावरण दिनाचे औचित्य साधून करण्यात आले.
पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने पावले उचलली पाहिजे
यावेळी गोरखे म्हणाल्या की, पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी, तसेच पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने पावले उलचलण्याचा संकल्प या पर्यावरण दिनानिमित्त सर्वांनी प्रयत्न करायला हवा. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी जास्तीत जास्त झाडे लावण्याची गरज असून त्यामुळे पाण्याची पातळी, हवामान नियंत्रित राहील. त्याबरोबरीने प्लॅस्टिकला आळा घालण्याची देखील गरज आहे. प्लॅस्टिकमुळे पर्यावरणाची हानी होत असल्याने नागरिकांनी आपल्या दैनंदिन जीवनात प्लॅस्टिकचा वापर टाळावा पाहिजे. तसेच, पर्यावरण जनजागृतीपर उपक्रमांमध्ये नागरिकांनी सहभागी होऊन योगदान दिेले पाहिजे”
यांची होती उपस्थिती
सिटी प्राईड शाळेत आयुक्त श्रावण हर्डीकर, अ प्रभागाच्या अध्यक्षा अनुराधा गोरखे व शाळेचे संचालक अभय कुलकर्णी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर अ प्रभागाच्या वतीने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गंत आकुर्डी मंडईत प्लॅस्टिक मुक्त मोहीम राबविण्यात आली. मंडईतील ग्राहकांना प्रातिनिधिक स्वरुपात ३०० कापडी पिशव्यांचे वाटप अनुराधा गोरखे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी नगरसेवक अमित गावडे, शर्मिला बाबर, वैशाली काळभोर, मीनल यादव, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, सहायक आयुक्त मंगेश चितळे, माजी नगरसेविका भारती फरांदे, आरोग्य अधिकारी एम. एम. शिंदे आदी उपस्थित होते.
दिंडी काढून देण्यात आला पर्यावरण संवर्धनाचा संदेश
याबरोबर पर्यावरण संवर्धन समिती, प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ, आंघोळीची गोळी अभियान यांच्या वतीने अ क्षेत्रीय कार्यालयापासून संत तुकारामनगर उद्यानमार्गे प्राधिकरणातील सिटी प्राईड शाळेपर्यंत पर्यावरण दिंडी काढण्यात आली. त्यामध्ये देखील अ प्रभागाच्या अध्यक्ष गोरखे यांच्यासह नगरेसवक, अधिकारी आणि कर्मचा-यांनी सहभाग घेतला. या दिंडीतून ‘झाडे वाचवा, झाडे जगवा’ व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.