खरं तर चळवळ हे असे सामाजिक परिवर्तनाचे असे अस्त्र आहे की, ज्या अस्त्राच्या साह्याने अहिंसक पद्धतीने मानव आपले हक्क, अधिकार व न्याय मिळवण्यासाठी याचा उपयोग करू शकतो. मात्र, त्या मुख्य चळवळीचा सूत्रधार व संघटक हा ध्येयाने झपाटलेला व युगपरिवर्तक विचाराचा असावा हे महत्त्वाचे! स्त्री ही अध्यात्म मार्गातील धोंड, ती मूर्ख, अविवेकी, चरित्रहीन, अपवित्र अशा कितीतरी पालुपदाने तिला नावाजल्या जाई! त्यामुळे तिचे अस्तित्व एखाद्या गळणार्या बहारासारखे कोलमडून पडले होते. इंग्रजीतून नवशिक्षण घेतलेल्या बुद्धीप्रामाण्यवादी तरुणांना समाज अस्थिरतेची खरी कारणे कळायला लागली. समाजाच्या राजकीय, आर्थिक, धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक जीवनात आधुनिक व वैज्ञानिक विचारांचा स्वीकार केल्याशिवाय समाजाचा विकास होणार नाही याची जाणीव समाजातील शिक्षित तरुणांना व्हायला लागली व त्यामुळेच समाजात खर्या अर्थाने प्रबोधन चळवळीला सुरुवात झाली. विशिष्ट समुदायाने एकत्र येऊन सर्वांच्या हितासाठी केलेले प्रयत्न व त्या प्रयत्नाच्या मागे एखादी मार्गदर्शक व्यक्ती किंवा विचार प्रणाली त्यामागे असते. त्या प्रेरणेने झालेल्या प्रयत्नास चळवळ, असे म्हणतात.खरं तर याच परिवर्तनवादी चळवळीनी समाजातील अस्थिरतेला प्रगतीच्या मार्गावर नेले. दादाभाई नौरोजी, लोकमान्य टिळक यांनी आपल्या संघटनेमार्फत व चळवळीमार्फत लोकांमध्ये नवविचाराचे बीज रोवून स्वराज्याची नवदृष्टी दिली. स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण याविषयी अभिमान जागृत करून ब्रिटिश सत्तेविरोधात रणशिंग फुंकले.
भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक देदीप्यमान पर्व म्हणजे सशस्त्र क्रांतिकारी चळवळ. या क्रांतिकारकांच्या असीम त्यागाने व बलिदानाने अनेक भारतीय जनतेला प्रेरणा देऊन कार्यप्रवृत्त केले. महात्मा गांधी यांची असहकार चळवळ, चलेजाव चळवळ व भारतीय स्वतंत्र चळवळीतील छोडो भारत अभियानामुळे इंग्रज हा देश सोडून जाण्यास बाध्य झाले.भारतीय स्वातंत्र्यानंतरही समाजात अनेक समस्या होत्या. त्यामुळे दलित व कामगार चळवळ अस्तित्वात आली. कामगारांना हक्क व योग्य श्रमाचा मोबदला मिळवून देण्यासाठी कामगार चळवळीचा उदय झाला, तर दलित चळवळींनी हजारो वर्षे मानवी हक्कापासून वंचित असणार्या समाजाला न्याय मिळून दिला. दलित चळवळ ही भारतीय स्वातंत्र्यपूर्व चळवळ असून, यात महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड, महर्षि शिंदे यांनी दलित समाजाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळावा यासाठी प्रयत्न केला. स्वातंत्र्यानंतर डॉ. आंबेडकरांनी समतेच्या चळवळीचे नेतृत्व स्वीकारून न्याय, हक्क व अधिकार मिळून दिला. समाजातील स्त्रीमुक्ती चळवळींनीही स्त्रियांना त्यांचे अस्तित्व मिळून दिले. त्यामुळेच स्त्री सबलीकरणाचे विचार समाजात रुजून स्त्री आपल्या हक्कांसाठी लढू लागली. स्त्री चळवळीमुळे स्त्रियांवर होणारे सामाजिक, धार्मिक अन्याय दूर करण्यासाठी व समाजातील जाचक रुढी नष्ट व्हाव्यात यासाठी स्त्री चळवळींनी महत्त्वपूर्ण कार्य केले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत 106 हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली व स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1मे 1960रोजी होऊन तमाम मराठी माणसांना एक नवी ओळख मिळवून दिली. अशा प्रकारे भारतीय इतिहासात चळवळींना महत्त्वपूर्ण स्थान असून, आजही अनेक क्षेत्रांत संघटनेमार्फत आपले हक्क व अधिकार मिळून घेण्यास अनेक संघटना सज्ज झाल्या आहेत. प्रत्येकच क्षेत्रातील चळवळीचे महत्त्वपूर्ण कार्य असून, याचे समर्थन प्रत्येक भारतीय नागरिकांनी करणे गरजेचे आहे. पण ती चळवळ भारतीय न्यायप्रणालीवर विश्वास ठेवून असावी तसेच या चळवळीमुळे समाजात कुठलेही प्रक्षुब्ध वातावरण निर्माण होणार नाही याचीही दक्षता घ्यावी लागेल!
– प्रा. वैशाली देशमुख, नागपूर
7420850376