मध्यवर्ती कार्यशाळेसमोर तीव्र निदर्शने
खडकी : श्रमिक तासाबाबत रामदेवबाबा टाईम अँन्ड मोशनच्या अहवालातील त्रुटी दुर कराव्यात प्रशासकीय व कार्यशाळा कर्मचारी नोकरभरती प्रश्न तातडीने मार्गी लावावा यासह इतर अनेक प्रलंबित मागण्यां संदर्भात महाराष्ट्र एस.टी.कामगार संघटनेच्यावतीने शनिवारी दापोडी येथिल मध्यवर्ती कार्यशाळेच्या प्रवेशद्वारा समोर तीव्र आंदोलन करण्यात आले. मागण्यांबाबत प्रशासनाने तातडीने सकारात्मक पाऊले ऊचलून योग्य तो निर्णय न घेतल्यास संघटनेच्यावतीने तीव्र स्वरुपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा या वेळी प्रादेशिक सचिव सुपलकर, विभाग अध्यक्ष धिवार व सचिव उलपे यांनी या वेळी दिला. दापोडी विभाग अध्यक्ष राहुल धिवार यांच्या मार्गदर्शनाखालील या आंदोलनात कार्याध्यक्ष शांताराम शिंदे, क्युआरटी. सदस्य चंद्रकांत चव्हाण यासह मोठ्या प्रमाणातील कर्मचारी वर्ग सहभागी झाला होता.
पाणी पुरवठा, डासांचा प्रश्न
आपल्या मागण्यांबद्दल बोलताना सुपलकर म्हणाले की, कामगारवर्गास विश्वासात न घेता जाचक स्वरुपाच्या लादलेल्या अहवालातील एकतर्फी कामवाढी संदर्भातील त्रुटी तातडीने दुर कराव्यात. एम.एस.बसचे सिट खिडकी व आराखडा इत्यादी कामे बाहेरील खासगी संस्थेकडून करून घेतली जात आहे. ते तातडीने थांबवावे. अनेक महिन्यांपासून कार्यशाळेत अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने कर्मचारी हवालदील झाले आहेत. प्रशानाने तातडीने मुबलक स्वरुपाचा पाणी पुरवठा अंमलात आणावा. सध्या कार्यशाळेत कामाच्या क्षमतेच्या केवळ 50 टक्के कर्मचारी असल्याने कर्मचारी वर्गावर कामाचा अधिक ताण पडला जात आहे तेव्हा प्रलंबित असलेली प्रशासकीय व कार्यशाळा कर्मचारी भरतीचा प्रश्न तातडीने निकाली काढावा सेवानिवृत होत असलेल्या कर्मचार्यांच्या रजा कपाती संदर्भात घेतलेला अन्यायकारक निर्णय मागे घ्यावा. कार्यशाळेत मोठ्या प्रमाणात डासांचा सुळसुळाट वाढला असून त्यामुळे कर्मचारी, अधिकारी वर्गांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. त्यावर उपया योजना करण्याची गरज आहे.