महापौरांच्या हस्ते केले अनावरण
पिंपरी : पाणीपुरवठा बंद आहे. शहरात अमुक भागात खोदाईची कामे सुरु आहेत. उत्सावादरम्यान कुठले रस्ते बंद असणार आहेत. वाहतूक कोठून वळविली आहे. याची इत्यंभूत माहिती शहरवासियांना आता ‘पिंपरी-चिंचवड महापालिका-वन’ या अॅपद्वारे मिळणार आहे. आदल्या दिवशीच माहिती मिळाल्याने नागरिकांचा मनस्ताप आता कमी होणार आहे. या अॅपचा पालिकेने बुधवारपासून वापर सुरु केला असून उद्यापासून पोलीस देखील वापर करण्यास सुरुवात करणार आहेत. प्लेस्टोअरमधून हे अॅप डाऊनलोड करावे लागणार आहे. महापालिका हे अॅप चालविणार असून त्याचा खर्च राज्य सरकारने केला आहे. पालिकेने ‘पिंपरी-चिंचवड-वन’ या नावाने मोबाईल अॅप कार्यन्वित केले आहे. या मोबाईल अॅपद्वारे नागरिकांना आवश्यक माहितीचे प्रसारण, संदेश, परिपत्रक, निवेदन इत्यादी स्वरुपाची सर्व माहिती एकाच अॅप द्वारे नागरिकांना सहजरित्या उपलब्ध होणार आहे. या अॅपचे महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते आज (बुधवारी) अनावरण करण्यात आले. यावेळी सभागृह नेते एकनाथ पवार, नगरसेविका भीमाबाई फुगे, निर्मला गायकवाड, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण उपस्थित होते.
हे देखील वाचा
नागरिकांच्या संपर्कात रहाणार
यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले की, नागरिकांना माहिती देणे व ती उपलब्ध करणे हे सुशासनासाठी उपयुक्त आहे. हे अॅप महापालिकेसाठी महत्वाचा पुढाकार असून योग्य रणनिती आहे. याद्वारे महापालिका थेट नागरिकांच्या संपर्कात राहील. आपत्कालीन वेळेस पालिकेला कोणते आवाहन करायचे असल्याच या अॅपद्वारे केले जाईल. आजारांबाबत जनजागृती केली जाईल. शहरामध्ये होणा-या घडामोडीची माहिती तातडीने नागरिकांना या अॅपद्वारे मिळणार आहे. या अॅपमध्ये माहितीचे विविध विषयवार स्वतंत्र भाग केले असून त्याबाबतचे नवे अपडेट त्या भागामध्ये विषयवार समाविष्ट करण्यात येणार आहेत. त्याचा महापालिकेने वापर सुरु केला असून पोलीस देखील त्याचा उद्यापासून वापर सुरु करणार आहेत. तसेच महापालिका, सारथी अॅपला हे लिंक करण्याचे काम सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. पोलिसांनी वाहतूक बंद केली आहे. उत्सावादरम्यान कुठला रस्ता बंद ठेवण्यात आला आहे, याची सर्व माहिती नागरिकांना या अॅपवरुन मिळणार आहे.