पिंपरी (प्रतिनिधी) – केंद्र आणि राज्य सरकारने टपरी, पथारी, हातगाडी धारकांसाठी केलेल्या कायद्याची अंमलबजावणी करण्याऐवजी फेरीवाल्यांवर पालिकेने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ गुरुवारी (दि.15 रोजी) पिंपरी-चिंचवड पालिकेवर महामोर्चा काढण्यात येणार आहे. कष्टकर्यांचे नेते बाबा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली हा महामोर्चा काढण्यात येणार असून प्रल्हाद कांबळे, बळीराम काकडे, धर्मराज जगताप, शोभा शिंदे, रमेश शिंदे, गणेश आहेर, सुदाम बनसोडे, सोमनाथ कलाटे आदी मोर्चात सहभागी होणार आहे.
सर्वेक्षणाचे फॉर्म पालिकेत देणार
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका नवीन सर्वेक्षण करत नसल्यामुळे कष्टकरी पंचायतच्या वतीने शहरातील खर्या आणि गोरगरीब जनतेचे सर्वेक्षण सुरू केले आहे. विनामूल्य फॉर्म भरून घेतले आहेत. हे सर्व फॉर्म वाजत गाजत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेस देण्यात येणार आहे, अशी माहिती शहर अध्यक्ष रमेश शिंदे यांनी दिली.
चुकीच्या पद्धतीने पुर्नवसन
गोर गरीब आणि खर्या फेरीवाल्यांना न्याय मिळावा आणि त्यांचे, पक्क्या गाळ्यांमध्ये पुर्नवसन व्हावे यासाठी हा महामोर्चा असून पिंपरी-चिंचवड महानगरपालिका चुकीच्या पद्धतीने पुर्नवसन करत आहे. पक्के गाळे देण्याऐवजी टपरी, पथारी, हातगाडी धारकांचे रस्त्यावरच पूर्नवसन होत आहे. अशा चुकीच्या पुनर्वसनास आमचा तीव्र विरोधात असून पंचायतच्या वतीने कष्टकर्यांचे नेते बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पुढेही विरोध होत राहणार, असे पंचायत अध्यक्ष रमेश शिंदे यांनी सांगितले.