विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादीचे आंदोलन

0

भोर । कर्ज माफीची रक्कम शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर दिवाळीपूर्वी जमा करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र, दिवाळी होऊन अनेक दिवस होऊन गेले तरी हे आश्‍वासन पाळले नाही. भोर तालुक्यातील 18 टक्के शेतकरी कर्जमाफीस पात्र असताना 2 टक्के शेतकर्‍यांनाही त्याचा लाभ मिळालेला नाही. नोटाबंदीच्या 8 नोव्हेंबर 2016 च्या निर्णयाने देशाची अर्थव्यवस्था कोलमडली असून, जीएसटीच्या निर्णयामुळ उद्योजक आणि व्यापारी वर्गात नाराजी पसरली आहे. यात सरकारने सुधारणा करावी. घरगुती गॅसच्या किंमतीत 93 रुपयांची वाढ केली आहे. ही दरवाढ सरकारने त्वरीत मागे घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे. सरकारचा नाकर्तेपणा आणि सर्वसामान्य जनतेबाबत उदासीनता समोर आली असून राष्ट्रवादी याचा निषेध करीत आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

भोरच्या तहसीलदार वर्षा शिंगण पाटील यांना भोर तालुका राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष चंद्रकांत बाठे, जिल्हा परिषद सदस्य रणजीत शिवतरे यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले. यावेळी भोर शहर अध्यक्ष नितीन धारणे, स्वप्निल जाधव, प्रकाश तनपुरे, सुहित जाधव, हसिना शेख, नगरसेविका सुनीता बदक आदी राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. मागण्यांचे निवेदन लागेचच सरकारकडे पाठवत असल्याचे तहसीलदारांनी आंदोलकांना सांगितले आहे.