भुसावळ : तिकीट चेकींग स्टाफला रोटेशनमध्ये भेदभाव दूर करून सर्वांना न्याय देण्यात यावा, एसपीएडी केसेसमध्ये रेल्वे सेवेतून कमी केलेल्या कर्मचार्यांना नोकरीत घेण्यात यावे, कर्मचार्यांचा थांबविलेला टीए तत्काळ देण्यात यावे यासह अन्य विविध न्याय मागण्यांसाठी सेंट्रल रेल्वे मजदूर संघातर्फे अनिश्चित काळासाठी भुसावळ डीआरएम कार्यालयाच्या परीसरात शुक्रवारपासून धरणे आंदोलनाला सुरूवात करण्यात आली आहे. दरम्यान, भारत सरकारने कामगारांच्या मागण्या मान्य न केल्यास रेल्वेचा चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या मागण्यांसाठी आंदोलन
तिकीट चेकींग स्टॉफला अमेनिटीमध्ये रेल्वे बोर्डच्या नियमानुसार डबे वाटप करण्यात यावे, तिकीट चेकींग स्टाफला पॅनल त्वरीत जारी करण्यात यावे, सर्व विभागातील रीक्त पदे त्वरीत भरावीत, खराब रस्ते दुरूस्त करावे, निवासस्थाने दुरुस्त करावे, मुख्यालयाच्या आदेशानुसार सहा ट्रॅक मेन्टेनन्स कर्मचार्यांना सी अॅण्ड डब्ल्यू मध्ये सोडण्यात यावे, टीटीइॅ लॉबीमध्ये सुविधा देण्यात याव्यात, भुसावळ बुकींग ऑफिसमध्ये थंड पाण्याचा कुलर लावावा आदी मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी डीआरएम कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन छेडण्यात आले आहे.
यांच्या उपस्थितीत धरणे आंदोलन
आंदोलनाचे नेतृत्व सीआरएमएसचे मंडळ अध्यक्ष व्ही.के.समाधिया यांनी केले आहे. या धरणे आंदोलनात मंडळ सचिव एस.बी.पाटील, मंडळ सचिव वर्कशॉप किशोर कोलते, मंडळ समन्वयक एस.के.दुबे, मंडळ संघटक पी.के. रायकवार, महिला अध्यक्ष कुंदलता थूल आदी सहभागी झाले असून त्यांनी भारत सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध केला. सरकार विरूध्द लढण्यासाठी कामगारांनी एक होऊन सीआरएमच्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. धरणे आंदोलनात सर्व शाखा सचीव, शाखाध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.