विविध मार्गाने कामगारांचे शोषण सुरूच : सबनीस

0

28 वी राज्यस्तरीय श्रम उद्योग परिषद उत्साहात

पिंपरी : कामगारांच्या रक्ताला जात, धर्म, पक्ष नसतो. कामगार हा विविध जातीधर्माचा नसून त्याच्याबाबत सर्वांची बांधिलकी असली पाहिजे. आज अनेक ठिकाणी विविध मार्गाने कामगारांचे शोषण चालू आहे. मालकांचे पुढारीच कामगारांचे शोषण करतात. कामगारांच्या पैशावर मालकाच्या मांडीला मांडी लावून बसणारे भ्रष्ट नेते आज दिसू लागले आहेत, हे बंद झाले पाहिजे. अशा भ्रष्ट नेत्यापासून वेळीच सावध झाले पाहिजे. केलेल्या कामाचा योग्य मोबदला मिळावा एवढी कामगारांची माफक अपेक्षा असते, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद आणि पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी यांच्यावतीने आयोजित 28 व्या राज्यस्तरीय श्रम उद्योग परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी उपमहापौर शैलजा मोरे उपस्थित होत्या.

यावेळी राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष किशोर ढोकले यांना भाई वैद्य स्मृती श्रम सारथी पुरस्कार, शर्मा प्रेसिंग वर्क्सचे एस.एस. शर्मा यांना महाराष्ट्र उद्योग मित्र पुरस्कार, रॉयल टुलिंग इंडस्ट्रीजचे महम्मद युनुस डांगी यांना महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार तर शिरुर तालुक्यातील रांजणगाव येथील स्वरोव्हस्की कामगार संघटनेला कामगार हितसंवर्धन कामगार संघटना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. श्रमप्रतिष्ठेसाठी उपेक्षित कष्टकर्‍यांचा सत्कार करण्यात आला. रस्त्यावरील चर्मकार बापू माने, शवविच्छेदन मजूर रमेश टाक, किसन नांगरे, मोलकरीण कौसल्या वाघमारे, लता रसाळ, पीठगिरणी कामगार रामदास कलापुरे, रस्ता सफाई मजूर सुजाता पंडीत, कुली बाबू शामराव गायकवाड, यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी किसन नांगरे, रामदास कलापुरे यांची प्रकट मुलाखत अनिल कातळे यांनी घेतली.

यावेळी उपमहापौर शैलजा मोरे, मनोहर पारळकर यांनी मनोगत व्यक्त केले. टाटा मोटर्सचे मनोहर पारळकर, सुदाम भोरे, पुरुषोत्तम सदाफुले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुरुषोत्तम सदापुले यांनी केले. सूत्रसंचालन उद्धव कानडे यांनी केले. राजेंद्र वाघ यांनी आभार मानले