विविध विभागांनी कामांची वस्तुनिष्ठ पद्धतीने माहिती सादर करावी

0

नंदुरबार । राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 17 मे रोजी नंदुरबार जिल्ह्यात नियोजित दौरा असून या दौर्‍याच्या पार्श्वभुमीवर राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन विकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसा मुंडा सभागृह येथे विविध विभागाच्या अधिकार्‍यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र डहाळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी घनश्याम मंगळे उपस्थित होते.

अधिकार्‍यांशी साधला संवाद
पालकमंत्री जयकुमार रावल बोलतांना पुढे म्हणाले की, या दौर्‍यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नंदुरबार जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा, झालेल्या कामांच्या ठिकाणी भेटी व जिल्ह्यातील अधिकार्‍यांसमवेत बैठक घेणार आहेत. यासाठी विविध विभागांनी जिल्ह्यात केलेल्या कामांची वस्तुनिष्ठ माहिती मुख्यमंत्री महोदयांना सादर करावी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस विभागाने आवश्यक ती कार्यवाही करावी. सादरीकरण करतांना जिल्ह्यातील विकास कामांवर आधारीत माहिती सादर करण्याच्या सूचनाही पालकमंत्री रावल यांनी यावेळी संबंधितांना दिल्या.

विविध विभागांच्या अधिकार्‍यांची उपस्थिती
जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी यावेळी जलयुक्त शिवार, शेततळे,कृषिपंप, विज जोडणी, वाडेपाडे विद्युतीकरण, सोलर कृषि पंप, स्वच्छ भारत मिशन, घरकुल योजना, शबरी आवास, पंतप्रधान आवास योजना, पिक कर्ज पुर्नगठन, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, आरोग्य सेवा,राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम, महिला व बाल कल्याण, कुपोषण या विविध विभागांची सादरीकरणासाठी तयार करण्यात स्लाईड शो मधील माहिती पालकमंत्री रावल यांना दिली. या बैठकीसाठी विविध विभागाचे विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते.