विविध समस्यांबाबत लोक जन शक्ती पार्टीचे धरणे आंदोलन

0

महापालिका आयुक्तांना दिले निवेदन

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील विविध सामाजिक समस्यांबाबत लोक जन शक्ती पार्टीच्यावतीने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक येथे मंगळवारी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. शहरातील विविध समस्या सोडविण्याबाबतचे निवेदन लोक जन शक्ती पार्टीच्यावतीने पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना देण्यात आले. धरणे आंदोलनात लोक जनशक्ती पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा उपाध्यक्ष फारुख सत्तर कुरेशी, मराठवाडा कार्याध्यक्ष शिवाजी झोडगे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अशोक कांबळे, युवक अध्यक्ष धुराजी शिंदे, नसीम शेख, सचिन झेंडे, प्रवीण कांबळे, विजय ढवळे, संजय आल्हाट, अशोक कसबे आदी उपस्थित होते.

शौचालयांची स्वच्छता हवी
महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील स्मशानभूमीतील शौचालयांची स्वच्छता नियमित करावी. स्मशानभूमीतील टाकाऊ कचर्‍याची नियमित विल्हेवाट लावावी. गांधीनगर झोपडपट्टीमध्ये ड्रेनेज लाईन नसल्यामुळे शौचालये बांधण्यास अडचण होत आहे. त्यामुळे या भागात ड्रेनेज लाईनचे काम करून शौचालये बांधण्यासाठी नागरिकांना योग्य ते सहकार्य करावे. डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा मैदानात लावण्यात येत असलेल्या वाहनांवर कारवाई करून मैदानाला संरक्षक भिंत बांधावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा उद्यानातील भीमसृष्टीच्या कामात दिरंगाई होत असून या कामास वेग द्यावा. दिरंगाई करणार्‍या अधिकार्‍यांवर योग्य ती कारवाई करावी. तसेच पुतळा उद्यानामागील जागेत सांस्कृतिक सभागृह तयार करावे.

फेरीवाल्यांचे परवाने द्यावेत
टपरी, पथारी हातगाडी व फेरीवाल्यांचे पूर्ण सर्वेक्षण करून त्यांना तात्काळ परवाने द्यावेत. शहर फेरीवाला धोरण अंमलबजावणी त्वरित करून सध्या टपरीधारकांवर होत असलेली अतिक्रम कारवाई थांबवावी. शहरात टेलिफोन कंपन्यांकडून टेलिफोन वायर रस्त्यावरून, फूटपाथ वरून टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे रस्त्यांचे व शहराचे विद्रुपीकरण झाले आहे. त्याबाबत संबंधितांवर कारवाई करावी. दापोडी ते निगडी मार्गावर शौचालयांची संख्या वाढवावी. पिंपरी चौकाकडून गोकुळ हॉटेल दरम्यान खाजगी वाहने व रिक्षा तसेच हातगाडीवाले बेकायदेशीररीत्या थांबतात. त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. तसेच पिंपरी चौक ते गोकुळ हॉटेल पर्यंत रस्त्याच्यामध्ये डिव्हायडर बसवून त्यात झाडे लावावी. त्यामुळे शहराच्या सुशोभीकरणात भर पडेल, असेही निवेदनात म्हटले आहे.