पिंपरी-चिंचवड । महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक केेंद्रप्रमुख सभा, पिंपरी-चिंचवडतर्फे ‘शाडू मातीचे गणपती बनवणे’ या विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा 19 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते दुपारी चार या वेळेत चिंचवड स्टेशन येथील महापालिका शाळेत होणार आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पाण्यात लवकर विरघळत नाहीत.
त्यामुळे पाण्याचे प्रदूषण होऊन जलचर प्राण्यांचा अधिवास धोक्यात येतो. पर्यावरणाचा समतोल त्यामुळे ढासाळतो. त्यामुळेच इको फ्रेंडली गणेशमूर्ती तयार केल्या पाहिजेत. शाडू मातीपासून बनविलेल्या गणेशमूर्ती पाण्यात त्वरित विरघळतात. शिवाय त्या इको फ्रेंडली असतात. त्यामुळेच शाडू मातीच्या गणेशमूर्तींना प्राधान्य दिले पाहिजे. या कार्यशाळेत सर्व साहित्य संघटनेतर्फे पुरविण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट गणेशमूर्ती तयार करणार्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. या विषयात आवड असणारे नागरिक, शिक्षक व विद्यार्थ्यांना कार्यशाळेत सहभागी होता येईल, अशी माहिती पदवीधर शिक्षक संघटनेचे अध्यक्ष मनोज मराठे यांनी दिली आहे.