पुणे । हवेत रंगीबेरंगी फुगे सोडत… घोड्यावरून रपेटीचा आनंद लुटत… मेरी गो राउंडचा थरार… विदुषकांची करमणूक… डीजेवर नृत्याचा नृत्याविष्कार व धमाल करत सुमारे 400 मतिमंद, मूकबधिर, अनाथ मुलांनी आनंदोत्सवाचा आनंद शनिवारी कॅम्प एज्युकेशनच्या शाळेत लुटला.
विविध शाळांमधील मुलांचा सहभाग
त्यांच्याबरोबरच महिला क्रिकेटपट्टू कल्पना तापीकर, प्रसिद्ध बालकलाकार अथर्व कर्वे, अतुल गायकवाड, दिलीप गिरमकर, संजय गुदमवाड, नितीन पंडित, पियुष शहा या विशेष मुलांच्या आनंदोत्सवात उत्साहाने सहभागी झाले. लोणी काळभोर येथील महावीर निवासी मतिमंद शाळा, वडगाव मावळ येथील वनवासी कल्याण शाळा, उरुळी कांचन येथील निवासी मतिमंद शाळा, उरुळी कांचन येथील महावीर मूकबधिर मुलामुलींची शाळा, तैय्येब्बा आर्फेन्ज स्कूल अनाथ मुलांची शाळा, रिदम फाउंडेशन, सेवाधाम मतिमंद मुलांची शाळा या विविध शाळांमधील सुमारे 400 विशेष मुले या आनंदोत्सवात सहभागी झाली होती.
आगळा-वेगळा आनंदाचा जल्लोष
केअर टेकर्स सोसायटी या संस्थेने या मुलांचा आनंदोत्सव आयोजित केला होता. आनंदोत्सवाचे यंदाचे 14 वे वर्ष होते. संस्थेचे अध्यक्ष कुमार शिंदे, पवन देडगावकर, रणजित परदेशी, इरफान मुल्ला, कपिल कल्याणी, शुभा जाधव, मीनल खरात, बालसुंदर ठुबे यांनी या मुलांना एक आगळा वेगळा आनंद मिळवून देत त्यांच्या जल्लोषात सहभागी झाले.
‘हम भी कुछ कम नही’ची झलक
या आनंदोत्सवास रंगीबेरंगी फुगे सोडत प्रारंभ झाला. विदुषकांनी करमणूक करून हलकंफुलकं वातावरण निर्माण केले. त्यापाठोपाठ या मुलांनी नकली बंदुकीतून नेम धरत पडद्यावरील फुगे फोडत ‘हम भी कुछ कम नही’ याची झलक दाखवतच उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या. ‘झुक झुक गाडी’तून सफर केली. घोड्यावरच्या रपेटीने तर त्यांच्यात विरश्री संचारली होती. आणि रपेट करत असतानाच ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ घोषणाही दिल्या. डीजेवर धमाल करत; वेगळे-वेगळे नृत्याविष्कार करतच त्यांनी अथर्वलाही डान्स करायला लावले.