पिंपरी-चिंचवड । दोन आठवड्यांची विश्रांती घेतल्यानंतर पावसाने शहरात गुरुवारपासून दमदार पुनरागमन केले आहे. पिंपरी-चिंचवड शहर परिसरासह मावळात संततधार सुरू आहे. गेल्या 24 तासात सुमारे 130 मिमी पावसाची नोंद करण्यात आली असून, आजअखेर 1330 मिमी पावसाची नोंद झाली आहे. दोन दिवस झालेल्या दमदार पावसामुळे शहरासाठी जीवनदायिनी असणारे पवना धरणदेखील 50 टक्के भरले आहे. पावसामुळे इंद्रायणी, पवना व मुळा या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. गुरुवारी दिवसा आणि रात्री तसेच शुक्रवारी पहाटे आणि सकाळी जोरदार पाऊस झाला. त्यानंतर शुक्रवारी दिवसभर उघडीप होती. मात्र, रात्री पुन्हा पाऊस सुरू झाला. पावसामुळे अनेक ठिकाणी हानी झाली आहे. वाल्हेकरवाडीसह अन्य ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटनादेखील घडल्या.
1) पवना नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने चिंचवड गावातील श्री मोरया गोसावी घाटाजवळील जुना पूल पाण्याखाली गेला होता. तसेच मंदिरातदेखील मोठ्या प्रमाणात पवनेचे पाणी शिरले होते.
2) इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. चिखली-मोई पुलाजवळून इंद्रायणी नदीचे पात्र दुथडी भरून वाहत असल्याचे दिसून येत होते. इंद्रायणीचा पूर पाहण्यासाठी नागरिकांनी नदीकाठी गर्दी केली होती.
3) थेरगाव येथील श्री केजूदेवी बंधार्यावरून शुक्रवारी पवना नदीचे पाणी जोरात वाहत होते. चिंचवड गावातील थेरगाव पुलाजवळील घाटदेखील पाण्याखाली गेला होता. गेल्या दोन दिवसांपासून ही स्थिती आहे.
4) संजय गांधीनगर वसाहतीमधील झोपड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले होते. पवना नदीकाठच्या पिंपरीतील रिव्हर रोडवरील झुलेलाल घाटाजवळील झोपड्यांनाही पाण्याचा फटका बसला.