शहराकडून खेड्याकडे दर्जेदार शिक्षणाची सोय
आळंदी :- भारतीय गुरू-शिष्य परंपरेच्या आधारे शालेय पातळीवर विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करण्यासाठी एमआयटी शिक्षण संस्थेतर्फे विश्वशांती गुरुकुल सीबीएससी या राष्ट्रीय कीर्तीच्या शालेय शिक्षण संस्थेचे केळगाव-हनुमानवाडी येथील शाळेचे उदघाटन 22 मार्च रोजी होणार आहे.
ज्येष्ठ संगणक तज्ञ डॉ. विजय भटकर,शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या शुभहस्ते उदघाटन सोहळा होत असल्याचे एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा.राहुल कराड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी एमआयटी विश्व शांती विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. डी. पी. आपटे व विश्वशांती गुरुकुलाचे व्यवस्थापक प्रेम मेहता उपस्थित होते.उद्घाटन सोहळ्यास आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर,आमदार सुरेश गोरे ,विश्वशांती केंद्र पुणे आळंदीचे अध्यक्ष डॉ.विश्वनाथ कराड आदी उपस्थित राहणार आहेत.उद्घाटन सोहळ्या निमित्त शिवचरित्रकार नितीन बानगुडे पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरू- शिष्य परंपरेवर आधारित शिक्षण
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा.राहुल कराड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या या शाळेत शैक्षणिक वर्ष 2018-19 पासून नर्सरी ते आठवीसाठी प्रवेश मिळणार आहे. विश्वशांती गुरुकुल ही शारीरिक तंदुरूस्ती, मानसिक जागरूकता, बौद्धिक कुशाग्रता व आध्यात्मिक उन्नती या स्तंभांवर आधारित आहे. भारतीय गुरू-शिष्य परंपरेवर आधारित येथे वैश्विक मूल्याधिष्ठित शिक्षण पद्धती असेल. पारंपारिक भारतीय शिक्षणाबरोबरच आधुनिक शिक्षण पद्धतीचाही अंतर्भाव केला जाईल.यात इंग्लिश या ज्ञान भाषेत प्रशालेचे शिक्षण असेल.मात्र मातृ भाषेला महत्व कायम राहणार आहे.
मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर
गुरुकुल च्या शाखा एकाच वेळी लातूर,इंदोर आणि आळंदी (केळगाव) येथे सुरु होत असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.दर्जेदार शिक्षण व मुलांचे सर्वांगीण विकासाचे शिक्षण देण्यास विशेष लक्ष दिले जाणार आहे. यात कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. शालेय पातळीवर विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करून त्यांची कारकीर्द घडविणे व त्यायोगे त्यांचे जीवन घडविण्याचा या गुरुकल शाळेचा उद्देश आहे. एक एकर जमिनीवर शाळेची शेती असून विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक ज्ञान मिळण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. भारतीय शिक्षणाचे मूल्य प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये रूजवितांना त्यांना योगा, ध्यान धारणा आणि विश्वशांतीचे महत्व शिकविले जाईल.