जळगाव – कपाशीवर फवारणीचे औषध मारत असतांना विषबाधा झाल्याने उपचारा दरम्यान कमाणी तांडा येथील एका 55 वर्षीय
शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
जिल्हा वैद्यकिय शासकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आले होते. जिल्हा पेठ पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, पांडूरंग धनसिंग चव्हाण (वय-55) रा. कमाणी तांडा ता. जामनेर हे आपल्या स्वत:च्या लोंढे शिवारातील शेतात कपाशीच्या पिकावर फवारणी करत असतांना 8 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास विषबाधा झाले.
नातेवाईकांनी त्यांना तातडीने पाळधी येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती अजून खालावल्याने खासगी वाहनाने जिल्हा शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. अखेर मृत्यूशी झुंज देत असतांना सोमवारी भल्या पहाटे 3 वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, आई, चार भाऊ असा परीवार आहे. जिल्हा पेठ पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून प्राथमिक तपास पोहेकॉ दिलीप सोनार करीत आहे.