विषमतेच्या मूळाशी लिंग आधारीत भेदभाव ही मोठी पोकळी

0

भारतीय संविधान जनजागरण अभियनांतर्गत व्याख्यान
तृतीयपंथी विचारवंत दिशा पिंकी शेख यांची भावना
पिंपरी-चिंचवड :  ‘संस्कृतीने हजारो वर्षापासून आम्हाला माणूस मानलंच नाही; परंतु संविधानाने व्यक्ती हा शब्द अधोरेखित करून आमचा माणूस म्हणून विचार केला. त्यामुळे एकूणच येथील सगळया विषमतेच्या मुळाशी लिंगआधारीत भेदभाव ही मोठी पोकळी आहे’, अशी भावना तृतीयपंथी विचारवंत दिशा पिंकी शेख यांनी आज येथे व्यक्त केली. पद्मयानी बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट व संविधान दिन सोहळा समिती पिंपरी चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधान जनजागरण अभियानाच्या आठव्या पुष्पमालेमध्ये ‘व्यक्तीस्वातंत्र्य व संविधान’ या विषयावर आयोजित व्याख्यानामध्ये त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अशोक शिलवंत होते.

आम्ही प्रथमपंथीय का नाही?
शेख म्हणाल्या, ज्या देशाचे संविधान जगभरात आदर्श मानले जाते, त्या भारतासारख्या देशात संविधान बचाव तसेच जनजागरण यासारखे उपक्रम राबवावे लागतात ही मोठी शोकांतिका आहे. देश स्वतंत्र झाल्यानंतर 67 वर्षानी शासनाला व्यक्ती या शब्दाचा अर्थ समजला आणि 2014 साली आम्हाला तृतीयपंथी माणूस म्हणून ओळख देण्यात आली.लिंगआधारित भेदभाव आमच्या वाट्याला कसा येतो याचे उदाहरण सांगताना दिशा शेख म्हणाल्या, “प्रथम पुरुष, द्वितीय स्त्री आणि मग आम्ही तृतीयपंथी येतो, आम्ही तृतीय पंथी आहोत हे कोणी ठरविले? मग आम्ही प्रथमपंथीय का नाही ? आपण जोपर्यंत अशी भाषा सोडणार नाही, तोपर्यंत समतेच्या वाटेवर आपण जाऊ शकणार नाही.

लिंगआधारित भेदभाव भारतात अधिक
लिंगआधारित भेदभावाचा मोठा पगडा भारतात आहे आणि हा पगडा टिकवून ठेवण्यासाठी जात धर्माची पाळेमुळे अधिक घट्ट स्वरूपात कामगिरी बजावतात असे दिशा शेख यांनी म्हटले. जात, वर्ग आणि लिंग याचा फार मोठा गुंता आपल्या व्यवस्थेत असल्याने तो समान पातळीवर सोडविणारे जगातले एकमेव पुस्तक म्हणजे संविधान आहे, की ज्यामध्ये कुठल्याही लिंगाचे साम्राज्य नाही. मानवी मूल्यांना सर्वाधिक महत्त्व या संविधानात देण्यात आले असले तरी सध्या वस्तु, वास्तु, विचार आणि सेवा आदी सर्वच मुलभूत अधिकारांचे खासगीकरण झाले असून आपलं शांत राहणं व कृतीशीलमध्ये त्याचे दर्शन न होणे हे आपल्या पराभवाचे मोठे कारण असल्याचे दिशा शेख यांनी नमूद केले.

यांची होती उपस्थिती
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, भारिपचे अध्यक्ष देवेंद्र तायडे, साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ, आदी जांबुमनी सेवा संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष मारूती पंद्री, अ‍ॅड लक्ष्मण रानवडे, विजय गेडाम, रतन गायकवाड, राहुल आंबोरे, लोखंडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. पांडुरंग वाघमारे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन विजय जगताप यांनी केले. विष्णू मांजरे यांनी आभार मानले.