गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी पोलिसांचा रूटमार्च
पिंपरी आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकार्यांची उपस्थिती
पिंपरी : सध्या सुरु असलेला गणेशोत्सव तीन दिवसात समाप्त होत आहे. त्यामुळे शहरात सर्वच गणेश मंडळे गणपती बाप्पांची विसर्जन मिरवणूक काढतात. विसर्जन मिरवणुकीत कोणत्याही प्रकारे कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पिंपरी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि परिमंडळ दोनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी आज (गुरुवारी) शहरातून रूटमार्च केला. पोलिसांच्या रूटमार्चमध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. हा रूटमार्च दुपारी चार वाजता पिंपरीमधील शगुन चौक येथून करण्यात आला. यामध्ये एक सहाय्यक पोलीस आयुक्त, तीन पोलीस निरीक्षक, 10 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक, 91 पोलीस कर्मचारी आणि एक एसआरपीएफ प्लाटून हजर होते.
हे देखील वाचा
पोलीस प्रशासन तत्पर
पिंपरी चिंचवड शहरातील गणेश उत्सव रविवारी (दि. 23) समाप्त होणार आहे. गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी सर्व मंडळे मिरवणूक काढतात. तसेच नागरिक देखील घरच्या गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी विसर्जन घाटांवर, नदीकडे जातात. विसर्जन मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात गर्दी असते. यावेळी कोणतीही अनुचित घटना किंवा प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासन तत्पर असते. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हा रूट मार्च आयोजित करण्यात आला.
कार्यकर्त्यांमध्ये नाराजी
डीजे बंदीमुळे गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत आहे. गणपतीची बाप्पाची विसर्जन मिरवणूक म्हणजे डीजे पाहीजेच, अशी मानसिकता, इच्छा मंडळातील कार्यकर्त्यांना असते. त्यामुळे मिरवणुकीमध्ये विघ्न येऊ नये यासाठी पोलिसांकडून रूटमार्च काढण्यात आला. डीजे बंदीमुळे काहीही होऊ शकते. काही अनुचित घटना घडू नये तसेच कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊ नये, यासाठी पोलिसांनी दक्ष राहून या मिरवणुकीवर नजर ठेवून आहेत. पोलिसांनी काढलेल्या रूटमार्चमुळे कार्यकर्ते व सामान्य नागरिकांना समजले की पोलीस प्रशासन विसर्जन मिरवणुकीबाबत सतर्क आहेत.