शिंदखेडा। नगरपंचायतीला ज्या भागातून मोठ्या प्रमाणात पाणीपट्टी व घरपट्टी अधिक प्रमाणात मिळते त्याच भागात बारा दिवसापासून पाणीपुरवठा होत नसल्याने नागरीकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पाणी पूरवठा सूरळीत करावा अशी मागणी या भागातील लोकांनी केली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे. बसस्थानकाच्या मागील बाजूस वरूळरोडच्या दुतर्फा आदर्श कॉलनी, एकविरा कॉलनी, विद्यासागर कॉलनी, इंदिरा कॉलनी, लालचंद नगर, बी.के.देसले नगर, स्वामी समर्थ कॉलनीचा विस्तार झाला आहे.
स्टॅण्ड पोस्टचा आधार : पुर्वीच्या ग्रामपंचायतीने विहिरी व विंधन विहिरीवरून पाईपलाईन करून व मोटर बसवून पाणी पूवरठ्यासाठी सार्वजनिक स्टॅण्ड पोस्ट तयार केले. बारा दिवसांपासून नळाला पाणी नसल्याने या स्टॅण्ड पोस्ट वरूनच नागरीक पाणी भरतात.हे पाणी पिण्यायोग्य नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती कायम आहे.
मोटर जळाल्याने समस्या : अक्कडसे पाणी पूरवठा योजनेची मोटर जळाल्याने अडचण येत आहे. फक्त सूलवाडे योजनेव्दारे पाणी पूरवठा होत आहे. पाणी पूरवठा सूरळीत करण्यासाठी नगरपंचायतीचे कर्मचारी युध्दपातळीवर काम करीत आहेत,अशी माहिती मुख्याधिकारी अजित निकत यांनी दै.जनशक्तिला दिली.
दोन वर्षे प्रतीक्षा अटळ
विस्तारीत शहराला एकवीस कोटी रूपयांची कायम स्वरूपी पाणी पूरवठा योजना मंजूर होवून प्रत्यक्ष कामाला सूरूवात झाली असली तरी योजना पूर्ण होण्यास दोन वर्षाचा कालावधी आहे. शहराला अक्कडसे पाणी पूरवठा योजना व सूलवाडे बॅरेज वरून पाणीपुरवठा होत आहे. विविध भागांमध्ये चार- पाच दिवसाआड पाणी पूरवठा करता येईल असे नगर पंचायतीचे नियोजन होते.परंतू हे नियोजन कोलमडलेे आहे. यामुळे कॉलनी परिसरात बारा दिवसांपासून नळाला पाणीच आलेले नाही.