विस्तारीत भागांच्या समस्या सुटेना

0

भुसावळ । शहरातील जळगाव रोडचा विस्तारित भागातील स्वामी विहार, अयोध्यानगर, शालीन पार्क, स्वरुप कॉलनी, वरदविनायक कॉलनी, महालक्ष्मी नगर, सीताराम नगर, नारायण नगर, मोरेश्वर नगर हा भाग साकेगाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये येत असून या भागातील नागरी सोयी सुविधा वाढवण्याच्या दृष्टीने 1 मे रोजी ग्रामसभेच्या दिवशी वरील भागांमध्ये पिण्याचे पाणी, रस्ते, डांबरीकरण, गटर बांधकाम, पथदिवे या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. साकेगाव सरपंच आनंदा ठाकरे, उपसरपंच शकील पटेल, ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील व ग्रामविकास अधिकारी, प्रा. धिरज पाटील, विशाल ठोके, प्रमोद पाटील, सी.एस.पाटील, राहुल कोलते, राजेंद्र कोलाटकर, विस्वास पोतदार, समाधान इंगळे व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वामी विहारपासून मोरेश्वर नगर ते सीताराम नगरच्या भागापर्यंत सांड पाण्याच्या व पिण्याच्या पाण्याच्या संबंधी प्रा.धिरज पाटील यांनी दोन वर्षांपासून पाठपुरावा सुरु केलेला होता.

ग्रामपंचायततर्फे बांधण्यात आली गटार
जळगाव रोड परिसरातील या विस्तारीत भागात साकेगाव ग्रामपंचायततर्फे या ठिकाणी गटर वरील दोन ढापे तसेच 350 फुटापेक्षा जास्त मोठी गटर बांधून देण्यात आली त्याबद्दल साकेगाव ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या भागात अधिक गंभीर असून बोअर कोरड्या झालेल्या आहेत.

शिष्ठमंडळ भेट घेणार
येथील पाणी पुरवठ्याच्या प्रश्‍नावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहे. विशेष अनुदानासाठी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांशी नागारिकांचे एक शिष्ठ मंडळ या महिन्यात भेट घेणार आहे. त्याठिकाणी पिण्याचे पाणी, रस्ते, डांबरीकरण, गटर बांधकाम या विषयांवर विशेष चर्चा करू, सोबत साकेगाव ग्रामपंचायत यांची देखील मदत आवश्यक असेल असे विशाल ठोके यांनी सांगितले. राज्य महामार्गावर कोठेही सावलीमध्ये उभे राहण्यासाठी जागा नाही. जळगाव रोड ते साकेगाव या राज्य मार्गावर वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन केले जाईल असे सरपंच ठाकरे यांनी सांगितले.

पालक मंत्र्यांकडे तक्रार
तसेच या भागात सुरु असलेला पाठपुरावा व नियोजन याची लवकरच माहिती देण्यात येईल असे ग्रामविकास अधिकारी यांनी सांगितले आहे. या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न थेट पालकमंत्र्यांकडे मांडण्यात येणार आहे, असे प्रा.धिरज पाटील यांनी याप्रसंगी सांगितले. 3 मार्च 2017 रोजी अवर सचिव वि.गो. चांदेकर यांनी प्रा.धिरज पाटील यांनी सादर केलेल्या तक्रारीतील मुद्दा लोकशाही दिनाच्या दिवशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी चर्चेला घेतला होता. त्यामुळे येथील पाण्याची समस्या सुटणार असल्याचे दिसून येते.