राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच ‘विस्थापित’ आणि ‘प्रस्थापित’ या शब्दांचा चपखल प्रयोग करून राजकीय वर्तुळात नवीन चर्चेला तोंड फोडले आहे. अर्थात, यावर त्यांच्याच पक्षातून उमटलेली प्रतिक्रिया आणि अन्य घडामोडींचा आढावा घेतला असून, भारतीय जनता पक्षातील खदखद नव्याने अधोरेखित झाली आहे. एकीकडे येनकेन प्रकारे पक्ष मजबुतीसाठी प्रयत्न केले जात असताना दुसरीकडचे हे नाराजीचे सूर भाजपमधील अंतर्द्वंदाला स्पष्टपणे अधोरेखित करणारे ठरले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय चातुर्याबाबत नव्याने सांगायला नको. स्वपक्षीय आणि विरोधी पक्षातील आपल्या विरोधकांना पुरून उरण्याचे कसब त्यांनी दाखवले आहे. यासोबत ते अतिशय सूचक बोलण्यासाठीही ख्यात आहेत. याअनुषंगाने अलीकडेच नागपूर येथे पत्रकारांशी गप्पा मारताना त्यांनी आगामी मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत ‘विस्थापित’ आणि ‘प्रस्थापित’ या शब्द प्रयोगाच्या माध्यमातून एकाच वेळी अनेक हेतू साध्य केले आहेत. एक तर नारायण राणे यांना मंत्रिपद मिळणार असले, तरी ते ‘विस्थापित’ असल्याचे सांगत या माध्यमातून त्यांचे पुनर्वसन होणार असल्याचे त्यांनी सूचित केले, तर दुसरीकडे आपल्या पक्षातील प्रतिस्पर्धी माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांना ‘प्रस्थापित’ म्हणून गोंजारत असताना त्यांचा मंत्रीपदाचा मार्ग सध्या तरी बंद असल्याचे बेधडकपणे सांगून टाकले. त्यांच्या या वाक्याच्या केंद्रस्थानी असणारे माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि माजी मंत्री खडसे यांना आपल्या वागण्यात थोडा वेगळा ‘गीअर’ टाकावा लागेल असे यातून दिसून येत आहे. मुळातच नारायण राणे हे अतिशय महत्त्वाकांक्षी नेते आहेत. यामुळे शिवसेनेत घुसमट होत असताना त्यांनी थेट काँग्रेसचा रस्ता पकडला. तेथेही मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन पाळले जात नसल्याचे पाहून त्यांनी बंडाचे संकेत दिले. पहिल्या प्रयत्नात त्यांनी थोडा धीर धरला. मात्र, लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभेतील दारुण पराभवामुळे ते अस्वस्थ झाले. पक्षाने त्यांना विधानपरिषदेवर पाठवले तरी एकंदरीतच काँग्रेसची भविष्यातील वाटचाल आणि पक्षांतर्गत विरोधकांना श्रेष्ठींकडून मिळणारी रसद पाहता त्यांनी पक्षत्याग करण्याचा निर्णय घेतला. भाजपनेही शिवसेनेला विरोध करण्यासाठी राणेंचा अप्रत्यक्ष उपयोग करण्याचे ठरवले आहे. यामुळे त्यांचा मंत्रिमंडळातील समावेश तसा निश्चितच मानला जात होता. मुख्यमंत्र्यांनी याला दुजोरा देताना राणे हे ‘विस्थापित’ असल्याचे वक्तव्य करून त्यांना हवा तो इशारा नक्कीच दिला आहे. मुळातच शिवसेनेच्या आक्रमक संस्कृतीत राजकीय कारकीर्द बहरलेल्या नारायण राणे यांना काँग्रेस पक्षात बर्याच प्रमाणात स्वभावाला मुरड घालावा लागला होता. आता भाजपच्या सहकारी पक्षाचे मंत्री म्हणून त्यांना आपल्या स्वभावात अजून बदल करावा लागणार असल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. नारायण राणे यांना एकीकडे भाजप संस्कृतीशी जुळवून घेताना शिवसेनेविरुद्ध आक्रमक भूमिका घ्यावी लागू शकते. एका अर्थाने त्यांना आगामी कालखंडात दुहेरी भूमिका बजवावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याच्या अगदी विरुद्ध भूमिकेत सध्या भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे हे आहेत. गेल्या वर्षी मे महिन्यात त्यांच्यावर एकामागून एक अशा आरोपांची सरबत्ती करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. यात दाऊद इब्राहिमच्या कथित कॉल प्रकरणापासून ते भोसरी येथील वादग्रस्त जमीन खरेदी आणि त्यांच्या निकटवर्तीयाचे लाच प्रकरण आदींचा समावेश होता. यामुळे प्रचंड खळबळ उडाली होती. विशेष बाब म्हणजे या प्रकरणावर विरोधकांनी फार काही मोठा गहजब न करताही खडसे यांना राजीनामा द्यावा लागला. तेव्हापासूनच ते पक्षावर नाराज आहेत. आधी खान्देशातील काही सार्वजनिक व्यासपीठांवरून त्यांनी आपल्या मनातील नाराजी व्यक्त केली. अलीकडच्या काळात मात्र त्यांनी थेट विधानसभेत आपल्याच पक्षाच्या मंत्र्यांना धारेवर धरण्यास प्रारंभ केला आहे. यातच त्यांनी पक्षावरच टीका करण्यास प्रारंभ केला आहे. त्यांची ही अस्वस्थता येत्या काही दिवसांत होणार्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर अतिशय सूचक अशीच आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांना ‘प्रस्थापित’ म्हणून गोंजारत त्यांना तूर्तास तरी मंत्रिमंडळात प्रवेश मिळणार नसल्याचे स्पष्ट संकेत मिळाल्यानंतर आगीत तेल ओतले गेले आहे. यानंतर त्यांनी नागपूर येथे संघाने भाजप मंत्री आणि आमदारांसाठी आयोजित केलेल्या ‘बौद्धिका’ला दांडी मारून आपली नाराजी दाखवून दिली आहे. यामागे खडसे यांनी आपल्या तब्ब्येतीचे कारण दिले असले, तरी त्यांची नाराजी उघडपणे दिसून आली आहे. गुजरात निवडणुकीत भाजपला अक्षरश: घाम गाळावा लागला आहे. यामुळे पक्षाच्या देशभरातील विविध असंतुष्टांमध्ये उत्साहाचे वारे संचारले आहेत. पक्षाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा हे अधूनमधून नेतृत्वाला चिमटे काढत असतात. या निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच खासदार नाना पटोले यांनी पक्षत्याग केला, तर दुसरे खासदार काकडे यांनी पक्षाच्या पराजयाचे भाकीत करून खळबळ उडवून दिली. आमदार आशिष देशमुख यांनी तर स्वतंत्र विदर्भाचा राग आळवण्यास प्रारंभ केला असून, त्यांचे लक्ष्य भाजपच असल्याचे अधोरेखित झाले आहे. पक्षातून हे नाराजीचे सूर उमटत असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी नारायण राणे यांच्यासारख्या आजवर विरोधात असणार्या नेत्याला मंत्रिमंडळात सामावण्याची केलेली तयारी ही अजून एका नवीन वादाला जन्म देणारी ठरणार आहे. मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात मुख्यमंत्री फडणवीस हे दोन-तीन मंत्र्यांना घरी बसवू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यात एखाद्या ज्येष्ठ मंत्र्याचे नाव असण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही. नारायण राणे हे मंत्रिमंडळात आल्यानंतर विरोधकांना अंगावर घेऊ शकतात. याच्या सोबतीला शिवसेनेच्या मंत्र्यांना चाप घालण्याची कामगिरी त्यांच्याकडे असेल हे स्पष्ट आहे. गुजरातच्या निकालानंतर विरोधकांमध्ये चैतन्याचे वारे संचारणार असल्यामुळे भारतीय जनता पक्ष या माध्यमातून आपली तटबंदी करणार असल्याची बाब तशी अपेक्षितच आहे. मात्र, दुसरीकडे खडसे यांच्यासारख्या ज्येष्ठांना डावलून हे शक्य होणार का? पक्षातील असंतुष्टांच्या कारवायांना आळा कसा घालणार? या प्रश्नांची उत्तरे शोधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कस लागणार आहे.