जानेवारीत दोन महिन्यांचा स्थिर आकार लावला
पुणे : महावितरणने पुणे विभागामध्ये अनेक वीजग्राहकांना दुहेरी शुल्काचा झटका दिला आहे. जानेवारी महिन्यात हातात पडलेल्या वीजदेयकामध्ये एका नव्हे, तर दोन महिन्यांचे स्थिर आकार शुल्क आकारण्यात आले आहे. वर्षभरात अकराच वीजदेयके दिल्या गेलेल्या वीजग्राहकांना जानेवारीत दोन महिन्यांचा स्थिर आकार लावला असल्याचा दावा महावितरणकडून करण्यात येत आहे. मात्र, ग्राहकांची कोणतीही चूक नसताना त्यांना वाढीव वीजदेयकाचा भुर्दंड कशासाठी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पुणे विभागातील काही ग्राहकांना जानेवारी महिन्यात दोन महिन्यांचा स्थिर आकार लागला असल्याची कबुली महावितरणकडून देण्यात आली आहे. मात्र, या ग्राहकांना 12 महिन्यांपेक्षा अधिक महिन्यांचा स्थिर आकार लावण्यात आला नसल्याने त्यात ग्राहकांचे नुकसान नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
एका वर्षांमध्ये 12 महिन्यांचे 12 वीजदेयक ग्राहकांना देण्यात येतात. पूर्वी काही ग्राहकांना वर्षांतून दोन-तीनदा 30 दिवसांपेक्षा अधिक कालावधीचे देयक दिले जात होते. त्यामुळे 12 ऐवजी 11 वीजदेयके दिली गेली. आता केंद्रीय वीजदेयक प्रणालीमध्ये प्रत्येक ग्राहकाच्या मीटर रीडिंगचा दिवस नक्की करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्यात एकाच महिन्याचे वीजदेयक देण्यात येत आहे. या प्रक्रियेत सर्व ग्राहकांत एकसमानता आणण्यासाठी काही ग्राहकांना दोनदा स्थिर आकार लावण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. महावितरणकडून त्यांची बाजू सावरण्यात येत असली, तरी ग्राहकांचा कोणताही दोष नसल्याचे स्पष्ट होत असल्याने याबाबत रोष व्यक्त करण्यात येत आहे. वर्षभरात 12 ऐवजी 11 वीजदेयके दिली असल्यास त्यात महावितरणचीच चूक आहे. त्यामुळे या चुकीचा भार ग्राहकांवर का? प्रश्न उपस्थित होत आहे.
दुहेरी स्थिर आकार नव्या दरांनुसार
ग्राहकांची कोणतीही चूक नसताना हा भुर्दंड देण्यात आला आहे. महावितरणने केलेल्या दाव्यानुसार ग्राहकाला वर्षांत 11 वीजदेयके दिल्याचे शक्य नाही. दिली असली तरीही दुहेरी स्थिर आकार वाढलेल्या नव्या दरांनुसार लावण्यात आला आहे. तो आधीच्या दरांनुसार नाही. ग्राहकांना दोन्ही बाजूने झोडपले जात असल्याचा आरोप सजग नागरिक मंच अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केला आहे.