वीजतारा दुरूस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

0

चिंबळीः महावितरण विभागाकडून अनेकवर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या केळगाव-चिंबळी रस्त्यावरील विद्युतवाहक तारांची अवस्था बिकट झाली आहे. त्या खाली झुकल्या आहेत. यामुळे अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाविरणने तात्काळ या तारांची दुरुस्ती करुनसंभाव्य धोका टाळण्याची मागणी वाहनचालक करत आहेत. आषाढी वारी तोंडावर आली असून सुरक्षेच्या दृष्टीने उपाय योजना करण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. आसाराम बापू आश्रमासमोर महावितरणच्यावतीने अनेक वर्षांपूर्वी सिमेंट खांब उभारुन परिसरातील रहिवाश्यांना विद्युतपुरवठा करण्यात आला आहे.

काळाच्या ओघात या विद्युततारा जीर्ण झाल्या असून त्या खाली लोंबकळलेल्या अवस्थेत आहे. त्या तारांच्या खालूनच केळगाव-चिंबळी रस्ता जात असून रस्त्याला चढण आहे. यामुळे एखादे मोठे वाहन आल्यास या तारांचा थेट स्पर्श वाहनाच्यावरच्या बाजूस होऊ शकतो. या तारांचा स्पर्श झाल्यास शॉक बसून वाहनामधील प्रवाशी जखमी ही होऊ शकतात. या मार्गावर रात्रीच्या वेळी अवझड़ वाहनांची, आळंदीस येणार्‍या वाहनांची मोठी वर्दळ असते. अंधारात वाहनचालकाला या तारा दिसून न आल्यास स्पर्श होऊन मोठा अपघातही घडू शकतो. यामुळे महावितरणने तात्काळ या मागणीची दखल घेऊन तारा दुरुस्त कराव्यात.